दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑक्टोबर २०२२ । फलटण । फलटण येथे होणार्या राष्ट्रीय किशोर / किशोरी खो – खो सामन्यांचे उद्घाटन उद्या दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत.
फलटण येथे खो – खो फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशन व सातारा जिल्हा ॲॅमॅच्युअर खो – खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो – खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धा या फलटण येथील श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल येथे दि. २९ ऑक्टोबर २०२२ ते दि. ०२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत संपन्न होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन हे दि. २९ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमास माजी मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष व आमदार अभिमन्यु पवार, भारतीय खो – खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, भारतीय खो – खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंह त्यागी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
फलटण येथे राष्ट्रीय किशोर किशोरी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. 29 ऑक्टोबर 2022 ते दि. 02 नोव्हेंबर 2022 पर्यंत फलटण येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटण नगरी सज्ज झाली असून त्यासाठी असणारी आवश्यक सर्व तयारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिलचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो – खो संघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयराव मोरे, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. गोविंद शर्मा, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांच्या विशेष उपस्थिती लाभणार आहे.
फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडांगणावर सर्व स्पर्धा संपन्न होणार आहेत. सदर होणार्या सामन्यांच्या मैदानांवर खो – खो खेळाचे राष्ट्रीय खेळाडू व जेष्ठ मार्गदर्शक स्व. पी. जी शिंदे यांच्या स्मरणार्थ भव्यदिव्य कमान महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनच्या वतीने उभारण्यात येणार आहे. या पुर्वी झालेल्या राष्ट्रीय खो खो सामने हे स्व. पी. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले होते.
तरी सदरील उद्घाटन समारंभासाठी सर्व खेळाडूप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व सातारा जिल्हा ॲॅमॅच्युअर खो – खो असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे यांनी केलेले आहे.
फलटण येथे संपन्न होणाऱ्या किशोर / किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी एकूण 47 संघ भाग घेणार आहेत. त्यामधील 24 संघ किशोर म्हणजेच मुलांचे आहेत तर 23 संघ किशोरी म्हणजेच मुलींचे आहेत. माजी आमदार स्वर्गीय श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडां संकुल येथील मैदानावर सदरील सामने संपन्न होणार आहेत. सदरील क्रीडांगणावर प्रेक्षकांसाठी भव्य दिव्य अशी दहा हजार आसन क्षमता असलेली प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आहे. यामध्ये पत्रकारांसाठी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया असे कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. यासोबतच गुणलेखक कक्ष व पदाधिकारी कक्ष सुद्धा क्रीडांगणावर उभारण्यात आलेले आहेत.
येथे उभारण्यात आलेल्या गॅलरींना स्वर्गीय मा. नगराध्यक्ष अशोकराव देशमुख गॅलरी , स्वर्गीय किरण विचारे गॅलरी, स्वर्गीय विजयकुमार खलाटे गॅलरी, माजी नगरसेवक स्वर्गीय जगन्नाथ कुंभार गॅलरी अशी नावे देण्यात आलेली आहेत. यासोबतच संपन्न होणाऱ्या खो खो स्पर्धांच्या भव्य अशा प्रवेशद्वारास स्वर्गीय पी. जी. शिंदे यांचे नाव देण्यात आलेले आहे.
क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या चार मैदानांवर सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामधील तीन मैदाने ही मातींची असून एक मॅटचे मैदान तयार करण्यात आलेले आहे. सकाळच्या सत्रात 20 मॅच खेळवल्या जाणार आहेत. तर सायंकाळच्या सत्रामध्ये एकूण 15 मॅच खेळवल्या जाणार आहेत. सायंकाळच्या सत्रातील सर्व सामने प्रकाशझोतात खेळवीन्यात येणार आहेत.
सामन्यांमध्ये खेळताना एकूण आठ गट असणार आहेत. त्या सहा गटातून दोन रनर व दोन विनर अशा दोन गटांमध्ये बाद फेरीमध्ये जाणार आहेत. त्यानंतर उपांत्यपूर्व सामना, उपांत्य सामन्या व अंतिम सामना अशा पद्धतीने सामने संपन्न होणार आहेत.
सकाळच्या सत्रामध्ये २ उपांत्य सामने खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये २ किशोरी म्हणजे मुलांचे तर २ किशोरी म्हणजे मुलींचे सामने संपन्न होणार आहेत. त्यानंतर तृतीय नंबर साठी सकाळच्या सत्रामध्ये सामना संपन्न होणार आहे. किशोर व किशोरी यांचा अंतिम सामना सायंकाळी मॅट वरील मैदानावर संपन्न होणार आहे.