दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । मुंबई । आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना बुधवारी सांयकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील दोन परिचारिकांचा समावेश आहे.
12 मे रोजी ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ यांच्या जन्मदिन हा ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. कोरोना महामारीची साथ मागील वर्षापासून सुरू असल्यामुळे यावर्षी 12 मे रोजी हा कार्यक्रम होऊ शकला नाही. बुधवारी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वर्ष 2020 चे राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुंटुब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.
जळगाव जिल्ह्यातील खुर्द येथील उपकेंद्रातील प्रेमलता संजय पाटील या ऑग्जिलिएरी नर्स मिडवाइव्स (एएनएम) आहेत. मागील 14 वर्षांपासून त्या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. श्रीमती पाटील महिलांना समुपदेशन करण्याचे काम उत्तम प्रकारे पार पाडतात. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातंर्गत असणारी कामे त्यांनी चोख पार पाडली आहेत, त्यांच्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा सामान्य रूग्णालय, गडचिरोली येथील आंतर रूग्ण विभागाच्या परिचारिका शालिनी नाजुकराव कुमरे यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा परिचारिका क्षेत्रातील 35 वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती कुमरे आपले काम पूर्ण क्षमतेने पार पाडतात. आपत्कालिन जीवन रक्षात्मक प्रणाली (Emergency life saving machine) त्या सक्षमपणे सांभाळतात. यासह त्या नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी बजावत आहेत. आरोग्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या ‘अवयव दान’ क्षेत्रातही त्या काम करतात.
प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष 2020 असून एकूण 51 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे.