दैनिक स्थैर्य । दि.०२ मे २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिनी राष्ट्रध्वजारोहण कामगारांचे हस्ते करण्याचा नवा उपक्रम फलटण नगर परिषदेत यावर्षी सुरु करण्यात आला, यापुढे प्रत्येक वर्षी कामगार दिनी कामगारांचे हस्ते ध्वजारोहण व्हावे अशी अपेक्षा फलटण नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून फलटण नगर परिषद राष्ट्रध्वजारोहण भांडारपाल प्रकाश गणपत पवार, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी अरविंद प्रल्हाद सस्ते यांचे हस्ते करणेत आले, त्यानंतर मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड बोलत होते. यावेळी नगर परिषद विविध विभागाचे खाते प्रमुख, विविध विभागातील स्त्री – पुरुष कर्मचारी उपस्थित होते.
भांडारपाल प्रकाश गणपत पवार, अरविंद प्रल्हाद सस्ते आणि श्रीमती आशाबी सलाऊद्दीन शेख हे नजिकच्या काळात सेवानिवृत्त होत असून या ३ ही कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेत सुमारे ३४ वर्षे प्रदीर्घ सेवा केली आहे. या कार्यक्रमात त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सत्कार मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्या हस्ते करणेत आला. सर्व कामगार बंधू भगिनींना नगर परिषदेच्यावतीने मिठाईचे बॉक्स व शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे नगर परिषदेच्यावतीने स्वागत करण्यात आल्यानंतर प्रकाश पवार व अरविंद सस्ते यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. पाणी पुरवठा विभाग प्रमुख विनोद जाधव यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
कोरोना महामारीच्या २ वर्षाच्या कालावधीत प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालुन, अहोरात्र सेवा करीत फलटण शहरातील नागरिकांना सुरक्षीत ठेवणारे नगर परिषद सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांना या कार्यक्रमातच भीमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संस्थाध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ, संदीप अहिवळे, मुकेश अहिवळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.