
दैनिक स्थैर्य | दि. 28 डिसेंबर 2024 | फलटण | फलटण तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा शाखेच्या वतीने 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, पुरवठा निरीक्षक अधिकारी नितीन कांबळे सहित अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करण्यात आले आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आव्हान दिले गेले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व पटवून देताना तहसीलदार डॉ. अभिजित जाधव म्हणाले, “प्रत्येक व्यक्ती विविध सेवांचा ग्राहक असल्याने ग्राहक हक्काबाबत जागरूकता आवश्यक आहे. सुधारित ग्राहक संरक्षण विधेयक 20 जुलै 2019 रोजी लागू झाले आहे, ज्यामध्ये जिल्हा आयोग व राज्य आयोग अशी रचना आहे. जिल्ह्यात एक कोटी पर्यंत, राज्यात दहा कोटी पर्यंत व त्यावरील रकमेचे दावे केंद्रीय आयोगाकडे असतील.”
नवीन कायद्यात ऑनलाइन व टेलिशॉपिंग कंपन्यांचा समावेश आहे. खाद्यपदार्थ व पेय यात भेसळ असल्यास तुरुंगवास व दंडाची तरतूद आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देणारे आणि त्या प्रसारित करणारे आयोगाला दंड करण्याचा अधिकार आहे. दोन वर्ष तुरुंगवास व 50 लाख दंडाची तरतूद आहे. डॉ. जाधव म्हणाले, “ग्राहकांची फसवणूक झाली असेल तर त्याला न्याय हा मिळतोच पण हक्कासोबत काही कर्तव्य आहेत. प्रत्येक खरेदीसाठी बिलांचा आग्रह धरला पाहिजे आणि खरेदी केलेल्या उत्पादनाची गुणवत्ता व सत्तेता देखील तपासली पाहिजे.”
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. ग्राहक हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्यांबद्दल माहिती देणारे विविध शासकीय कार्यक्रमांचे दालने लावण्यात आलेले आहेत. आवश्यक असल्यास तक्रार निवारणासाठी ग्राहक न्यायालयाकडे जावे, असे किरण बोळे यांनी सांगितले.