नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठी वापरले जावे – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२२ । नवी दिल्ली । नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठीही वापरले जावे, यासह राज्यांच्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.  याबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती, राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज  येथे दिली.

येथील रेल भवनात श्री. ठाकरे व केंद्रीय रेल्वे मंत्री श्री वैष्णव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत राज्यातील रेल्वेच्या विविध विषयांसोबत मुंबईतील रेल्वे विषयक प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना श्री. ठाकरे म्हणाले, नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्डच्या माध्यमातून ‘टॉप इन-टॉप आऊट’ करता येऊ शकते, या कार्डची सेवा बेस्टसाठी वापरली जाईल. या कार्डच्या माध्यमातून डिजिटल सेवेचा उपयोग करता येईल. देशातील सर्व मेट्रोसाठी हे कार्ड वापरता येऊ शकेल. हे कार्ड रेल्वेसाठी वापरता यावे व यासाठीची लागणारी प्रक्रिया केंद्रीय रेल्वे विभागाकडून करण्यात यावी, अशी विनंती राज्याच्यावतीने करण्यात आल्याचे श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या मागणीवर रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याबाबत श्री. वैष्णव यांनी बैठकीत आश्वासन दिल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले. यावेळी खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चर्तुवेदी उपस्थित होते.

मुंबईतील रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक

डिलाईल रोडवरील पूल, मुंबईतील रेल्वेच्या अधिनस्थ असणारे पूल, मेट्रो लेन, रेल्वे क्रॉसिंग, पावसामुळे साचलेल्या पाण्याने निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी रेल्वे विभागाकडून नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल. जेणेकरून मुंबईच्या रेल्वेविषयक समस्या सोडविण्याला अधिक गती मिळेल, अशी माहिती श्री ठाकरे यांनी दिली.

धारावी परिसरातील रेल्वे विकासासाठी रेल्वे सोबत राज्य सरकाराचा करार झाला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने रेल्वेला निधी दिला आहे. या विषयी सकारात्मक चर्चा झाली असून या सर्व कामांना अधिक गती मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.

श्री. ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी सदनची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.


Back to top button
Don`t copy text!