दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । बारामती । बारामती शहरात पुणे जिल्हा क्रिडा संकुलाचे नूतनीकरण करण्यात येत असून त्यामुळे संकुलाचे रुपडे पालटणार आहे. बारामती नगरी आता ‘क्रिडा हब’ म्हणून उदयास येत आहे. खेळाडूंसाठी ही आनंदाची बाब असून क्रीडा संकुलाच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी मदत होणार आहे.
क्रीडा संकुलात मुलांच्या वसतिगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे खेळाडूंच्या निवासाची चांगली सोय होणार आहे. कबड्डी, बॅडमिंटन, लॉन टेनिस, जिम, हॉलीबॉल, कराटे, बॉक्सिंग, टेबल टेनिस, स्पोर्टस झुम, फिटनेस योग, ओपन जिम इत्यादी सुविधा यात अंर्तभूत आहेत, अशी माहिती तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिली. क्रीडा संकुलाच्या नूतनीकरनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे राजेश बागुल व क्रीडा मार्गदर्शक अविनाश लगड यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे असेही ते म्हणाले.
जिल्हा क्रीडा संकुल पुणे अंतर्गत एम.आय.डी.सी. कटफळ येथे 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, 5 हजार क्षमता असलेली प्रेक्षक गॅलरी, हॉकी मैदान, चेंजिंग रुम, क्रिडा साहित्य रुम, स्केटिंग रिंग, शुटिंग रेंज, जलतरण तलाव, फिल्ट्रेशन प्लांन्ट, विविध खेळांची मैदाने, मुलामुलींचे वसतिगृह, वेटलिफ्टिंग हॉल, एक्सरसाईज हॉल, कराटे, बॉक्सिंग, फुल आर्चरी रेंज, सायकलिंग ट्रॅक, बहुउद्देशीय हॉल, व कॉन्फरन्स रुम इत्यादी कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावार आहेत.
संकुलाच्या शेजारील मार्केट यार्ड येथील 3 एकर जागेत बॉक्सिंग हॉल, कुस्ती हॉल, टेबल टेनिस, मिनी स्केटिंग रिंग कराटे, कबड्डी हॉल, खो-खो मैदान, जिम, 10 मिटर शुटींग रेंज, मिनी आर्चरी मैदान व बॉस्केटबॉल मैदान इत्यादी कामेही प्रगतीपथावर आहेत. तालुका क्रिडा संकुल माळेगाव येथे 11 एकर जागेवर 400 मिटर धावन मार्ग, बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल, कराटे, क्रिकेट, पोलीस प्रशिक्षण, जिम, लॉन टेनिस कोर्ट, व्हॉलिबॉल, कबड्डी आणि खो खो मैदान तयार करण्यात आले आहेत.
क्रीडा संकुलामध्ये तालुका क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक यांच्या माध्यमातून युवा खेडाळूंना खेळाचे महत्व पटवून देण्यात येते. युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध शासकीय योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी होत असल्याने क्रीडा संकृती रुजविण्यासाठी त्याची मदत झाली आहे. बारामती शहरातील तसेच ग्रामीण भागतील खेळाडूंचा स्पर्धामधील सहभाग वाढतो आहे.
क्रीडा संकुलातील सुविधांचा बारामती परिसरातील युवा खेळाडूंना विशेष उपयोग होणार आहे. त्यांच्यासाठी या सुविधा म्हणजे एकप्रकारे प्रोत्साहन ठरले आहे. एकूणच जिल्ह्यातील खेळाडूंनाही या सुविधांचा लाभ घेता येईल आणि त्यातून उद्याचे यशस्वी खेळाडू घडतील यात शंका नाही.
खेळाडूंना सुविधेसोबत चांगले प्रशिक्षणही देण्यात येते. तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांना 2002 मध्ये 44 देशांच्या आशियाई खेळामध्ये ॲथलॅटिक्स या खेळ प्रकारात पदक मिळाले आहे. त्यांनी तिन्ही सेनादलामध्ये ॲथलेटिक्स या खेळाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना त्यांच्यासारख्या निष्णात प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळणे ही जमेची बाजू आहे.
बारामती- परिसरात जवळजवळ सर्वच प्रकारच्या खेळांच्या अत्याधुनिक सुविधा आणि मैदाने उपलब्ध झाली आहेत. राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत म्हणून क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य प्रयत्न करत आहे. सध्या खेळामध्ये करिअर करण्याला खूपच वाव असल्याने इच्छुक युवा खेळाडूनी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.