स्थैर्य, नाशिक, दि.१०: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या कारणातून टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा खून करण्यात आला. भांडण सोडवण्यास गेलेल्या युवकावर हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाला. सोमवारी (दि. ८) रात्री ११.३० वाजता मातंगवाडा येथील महालक्ष्मी चाळ परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी बनेवाल टोळीच्या सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टोळीप्रमुख विशाल बनेवाल याच्यासह तीन-चार संशयित फरार झाले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, द्वारका परिसरातील मातंगवाडा येथील महालक्ष्मी चाळ येथे राहणारा आकाश संतोष रंजवे आणि त्याचा मित्र करण हे दोघे रात्री घराच्या अंगणात बसले असता संशयित विशाल बनेवाल, सतीश टाक, पवन टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बनेवाल, हरिष पवार, मनीष डुलगज, शिवम पवार आणि त्याच्या साथीदारांनी ‘तू हमारे भाई की खबर पुलिस को देता है’ असा वाद घालून चाॅपर, तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला.
या हल्यात आकाश आकाश रंजवे गंभीर जखमी झाला. त्याला सोडवण्यास गेलेल्या करणवरही टोळक्याने हल्ला केला. यात तोही गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी दोघांस तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना आकाश मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांच्या मागावर पथक पाठवले. यातील सहा संशयित ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांचे खबरे असुरक्षित; गुन्हेगारांकडून लक्ष्य
पोलिसांचे कान, नाक, डोळे म्हटले जाणारे व झिरो नंबर पोलिस म्हणून काम करणारे खबऱ्यांना गुन्हेगारांनी टार्गेट केले आहे. काही दिवसांपासून पोलिसांना माहिती देतो या कारणातून प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या घटना पोलिस दलात नक्कीच विचार करणाऱ्या आहेत. खबऱ्यांच्या जीवावर पोलिसांनी अनेक क्लिष्ट गुन्हे उघड केले आहे. मात्र, अशा जीवघेण्या हल्ल्यांमुळे पोलिसांना माहितीच कोणी देणार नाही. याचीदेखील गंभीर दखल यंत्रणेने घेणे गरजेचे आहे.
नातेवाइकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
रजेवेच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात जमा होत संशयितांना तत्काळ अटक करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. सहायक आयुक्त दीपाली खन्ना, निरीक्षक सोनवणे यांनी या प्रकरणात जे कोणी संशयित असतील त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले.
तडीपार गुन्हेगारांची दहशत सुरूच
शहर व परिसरात तडीपार गुन्हेगारांची दहशत सुरूच असून या प्रकरणात संशयित विशाल बनेवाल हा सराईत गुन्हेगार आहे. परिमंडळाच्या उपायुक्तांनी त्याला तडीपार केले आहे. तो शहरात वास्तव्य असल्याचे त्याने हा गंभीर गुन्हा केल्याने या तडीपार गुन्हेगारांनी एकप्रकारे पोलिस यंत्रणेला आव्हान दिले असल्याचे निदर्शनास येते.