
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय आणि फलटण ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशा मुक्त भारत माझी जबाबदारी’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमली पदार्थांच्या नशेला बळी पडू नये आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी केले. व्यसनी व्यक्तींना मदतीची गरज भासल्यास हेल्पलाइन क्रमांक १४४४६ वर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात, विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहून समाजात आदर्श निर्माण करावा, असे मत व्यक्त केले. तर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी, ‘नशा मुक्त भारत’ घडवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.
या व्याख्यानाला पोलीस शिपाई अविनाश शिंदे, दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. आर. कश्यप यांनी केले, तर आभार प्रा. ए. एस. शिंदे यांनी मानले.