महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ८ मार्च रोजी होणार सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०७ मार्च २०२२ । नवी दिल्ली । विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण 28 महिलांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. हे पुरस्कार वर्ष 2020 व 2021 साठीचे आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे, वनिता बोराडे या पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020 साठी तर वर्ष 2021 साठी सामाजिक उद्योजिका  कमल कुंभार यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काचे वितरण करण्यात येणार आहे.

कोविड महासाथीमुळे वर्ष 2020 च्या पुरस्कारांचे वितरण होऊ शकले नाही. 8 मार्च रोजी वर्ष 2020 आणि 2021 च्या पुरस्कारांचे वितरण होणार आहेत. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री तसेच अन्य मंत्री वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

या कार्यक्रमामध्ये एकूण 28 पुरस्कार, (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) एक पुरस्कार संयुक्तपणे दोन महिलांना देण्यात येणार आहे. समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणाऱ्या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून 29 महिलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, या महिला समाजाला दिशादर्शक असे काम करतात. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणुन त्यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात येते.

2020 च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवकल्पना उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएमआणि वन्यजीव संवर्धन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच 2021च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, एसटीईएमएम, शिक्षण आणि साहित्य, दिव्यांग अधिकारासाठी कार्य करणाऱ्या महिला यांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!