नॅनो युरियामुळे पिकाची नत्राची गरज भागून पिकाची पौष्टिकता व गुणवत्तेमध्ये वाढ होईल : कृषीमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । मालेगाव। सहकार तत्त्वावर सुरू झालेल्या इफको कंपनीच्या अथक संशोधनातून नॅनो युरिया हा लिक्वीड मध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. या नॅनो युरियामध्ये नत्र असल्याने पिकाची नत्राची गरज भागविली जाणार असून, त्यामुळे पिकाच्या पौष्टीकतेत व गुणवत्तेत वाढ होईल. त्याच बरोबर जमीन, हवा व पाणी यांची गुणवत्ता सुधारून हा प्रयोग पर्यावरणपूरक ठरेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

इफको नॅनो युरियाचा महाराष्ट्रात वितरणाचा शुभारंभ दूरदृष्यप्रणालीद्वारे आज राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरजकुमार, इफको संस्थेचे चेअरमन बलविंदर सिंग नकाई, संचालक डॉ.अवस्थी, कृषी विभागाचे संचालक दिलीप झेंडे, इफकोचे गुजरात युनिट हेड डी.जी.इनामदार, योगेंद्र कुमार आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, नॅनो युरिया मध्ये नत्राच्या कणाचा आकार हा 20 ते 50 नॅनोमीटर इतका असतो. नॅनो युरियाचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे बारीक युरिया पेक्षा 10 हजार पटीने जास्त असते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता जास्त असते. नॅनो युरिया मध्ये नत्राचे प्रमाण हे वजनाच्या 4 टक्के असते. नॅनो युरिया 2 ते 4 मि.ली. एक लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी केली असता नॅनो युरियातील नत्राचे शोषण पानावरील पर्णरंध्रेच्या (stomata) व्दारे पिकाच्या पेशीमध्ये होते. शोषण केलेला नत्र पेशीतील रिक्तिका (vacuole) मध्ये साठवला जातो व पिकाच्या गरजेनुसार पिकाला पुरवला जातो. यामुळे नॅनो युरियाची कार्यक्षमता 86 टक्के पर्यत जात असल्यामुळे बळीराजाला यामुळे नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्री श्री.भुसे म्हणाले, नॅनो युरियाची एक बाटली 500 मि.ली. आणि एका युरियाची गोणी 45 कि.लो. यांची कार्यक्षमता समान आहे. नॅनो युरियाच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते, नॅनो युरियाच्या वापरामुळे हवा, पाणी आणि जमीन यांची हानी थांबते. नॅनो युरिया पिकांच्या पानावर फवारत असल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा नसताना सुद्धा पिकाला नत्राचा पुरवठा करता येतो. नॅनो युरियामुळे जमीन पाणी हवामान व प्राणी यांची होणारी हानी टळेल, याबरोबर युरियासाठी द्यावी लागणारी सबसिडी निश्चितपणे वाचेल, असा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

फर्टीलायझर क्षेत्रात हा क्रांतीकारी उपक्रम ठरून युरियाचा अनावश्यक वापर टाळण्यास याचा नक्कीच उपयोग होईल असे सांगतांना सचिव श्री.डवले म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये ही एक चांगली सुरुवात असून यामुळे जमिनीचा पोत सुधारण्याबरोबर उत्पादनवाढीसाठी हा प्रयोग यशस्वी ठरेल. तर नॅनो युरियाच्या प्रकल्पाला शुभेच्छा देतांना आयुक्त धिरज कुमार म्हणाले, नॅनो युरियाच्या वापरासाठी कंपनीमार्फत ॲप विकसित करण्यात आले असून त्‍यासोबतच कृषी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांमध्ये नॅनो युरिया वापराचे तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!