“आरोप-प्रत्यारोपांचे दुकान बंद करा, विकासावर बोला”; ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मोरेंचे नेत्यांना खडे बोल


फलटण पालिकेच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांऐवजी विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ मांडा. अन्यथा जनआक्रोश सुफडासाफ करेल, असा सडेतोड इशारा सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी दिला आहे. वाचा सविस्तर.

स्थैर्य, फलटण, दि. 04 डिसेंबर : फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच, आता राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार यांचे समर्थक नंदकुमार मोरे यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “उठसूठ भूतकाळात रमण्यापेक्षा आणि एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा शहराच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ (Development Blue Print) मांडा, अन्यथा जनतेचा जनआक्रोश झाला तर निवडणुकीत सर्वांचाच ‘सुफडासाफ’ होईल,” असा सडेतोड इशारा नंदकुमार मोरे यांनी दिला आहे.

“आम्हीच सिकंदर” हा अविर्भाव सोडा

निवडणुकीच्या काळात अनेक कार्यकर्ते आणि अंधभक्त नाहक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. “आम्हीच सर्वकाही आणि आम्हीच मैदान मारले,” असा केविलवाणा प्रयत्न करून स्वतःला ‘सिकंदर’ समजणाऱ्यांनी जमिनीवर राहावे. वयोमानानुसार आणि संस्कृतीनुसार शब्दांचा वापर करावा. आज आणि उद्या सत्तेचा भत्ता बंद होणार आहे, याचे भान ठेवावे, असा टोला मोरेंनी लगावला आहे.

भूतकाळ नको, भविष्‍यावर बोला!

नंदकुमार मोरे यांनी राजकीय पक्षांना विकासाचा आराखडा मांडण्याचे आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “कुणी किती दिवे लावले, हे पब्लिकला माहीत आहे. त्यामुळे निष्फळ बडबड करण्यापेक्षा शहरासाठी कोणत्या पक्षाचे काय ध्येयधोरणे आहेत? विकासाची ब्ल्यू प्रिंट काय आहे? जनतेचे आर्थिक जीवनमान कसे उंचावणार? यावर आपले विचार प्रकाशित करावेत. पायाभूत सुविधा आणि मूलभूत गरजांवर भूमिका स्पष्ट करावी.”

सोशल मीडियावरील ‘नाटके’ बंद करा

सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चासत्रांवरही त्यांनी टीका केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ घोषणाबाजीसाठी न करता नीतीवर भर देण्यासाठी करावा. सोशल मीडियावर नाटके करण्यापेक्षा वैचारिक प्रगल्भता दाखवावी. भविष्यातील कामकाजावर आधारित चित्रपट रिलीज केला तरच लोक जवळ येतील, अन्यथा सावरायला सुद्धा कोणी येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या पिढीला संधी द्या

यंदा नवनिर्माण विचारांचे अनेक उमेदवार निवडणुकीत उतरणार आहेत. त्यांच्या अभिव्यक्तीला वाव दिला पाहिजे. स्वतःच्या निराशा आणि पराभवासाठी या नव्या दमाच्या उमेदवारांचा बळी देऊ नका. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सबुरीने आणि आनंदाने सहभागी व्हावे, असे आवाहन शेवटी नंदकुमार मोरे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!