
दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । सातारा । राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील खंडाळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नंदा तात्याबा गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी सुधीर चंद्रकांत सोनावणे यांची बिनविरोध निवड झाली पिठासीन अधिकारी तथा प्रांतधिकारी राजेंद्र जाधव व मुख्यधिकारी चेतन कोंडे यांनी ही माहिती दिली.
गुरुवारी झालेल्या विशेष सभेत अध्यक्ष पदासाठी बहुमत असलेल्या राष्ट्रवादीकडुन केवळ एकमेव अर्ज दाखल झालेल्या नंदा तात्याबा गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी चार फेब्रुवारीला एकच अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्ष निवड ही आज केवळ औपचारिकता होती तर उपाध्यक्ष निवडी साठी मात्र, राष्ट्रवादीकडुन सुधीर चंद्रकांत सोनावणे तर विरोधी भाजपा कडुन संदीप प्रकाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या कालावधीत भाजपाने हा उमेदवारी अर्ज माघार घेतला. यामुळे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे सुधीर सोनावणे हे बिनविरोध म्हणून निवडुन आले.
या निवडीनंतर नगरपंचायतचे नुतन पदाधिकारी, राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदीर येथे जाऊन दर्शन घेतले तर पंचायत समिती आवारातील महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे बुधवारी संध्याकाळी पक्षाकडुन निवडून आलेल्या नगरसेवकांची मुलाखत घेतली होती.आज सकाळी आमदार मकरंद पाटील यांनी याबाबतचा निर्णय खंडाळा राष्ट्रवादीला दिल्यानंतर राष्ट्रवादी कडुन उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.