दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । मुंबई । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी सांगितले. पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते तीव्र निषेध व्यक्त करतील, असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले की, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे. आपण याचा निषेध करतो.
मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर ‘तो मी नव्हेच’ असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.