दैनिक स्थैर्य | दि. 17 डिसेंबर 2024 | फलटण | येथील नाना नानी पार्क या अप्रतीम उद्यानात पक्षी, फुलपाखरे, नक्षत्र गार्डन, कारंजे वगैरे सर्व काही आहे, तथापि आता ज्ञान उद्यान (नॉलेज पार्क) या विस्तारानंतर हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याचे प्रतिपादन कमिन्स प्रशासन विभाग प्रमुख आशिष आग्रवाल यांनी केले आहे.
कमिन्स आणि वन विभागाच्या माध्यमातून फलटण मॉडेल टाऊन योजनेंतर्गत फलटण येथे विमान तळ परिसरात उभारण्यात आलेल्या नाना नानी पार्क या अप्रतिम उद्यान विस्तार प्रकल्पात उभारण्यात आलेल्या ज्ञान उद्यान चे (नॉलेज पार्क) उद्घाटन कमिन्स प्रशासन विभाग प्रमुख आशिष आग्रवाल यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले, त्यावेळी कमिन्स सी.आर. फंड प्रमुख सौजन्या वेगुरु, फलटण मॉडेल टाऊन प्रकल्पाचे प्रमुख प्रवीण गायकवाड, या प्रकल्पातील त्यांच्या सहकारी, (Eco) ईसीओ, सर्क्युलर इंडिया फौंडेशन सरोज बडगुजर यांच्यासह अन्य अधिकारी, ज्ञान उद्यान प्रकल्पाचे शिल्पकार बाळासाहेब पाटील, दत्तात्रय यादव, गांधी कलर लॅबचे रमण गांधी, स्विदिन गांधी व कुटुंबीय, प्रा. शिवलाल गावडे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, पत्रकार युवराज पवार यांच्या सह फलटण शहरवासीय उपस्थित होते.
ज्ञान उद्यानच्या (नॉलेज पार्क) माध्यमातून येथील विद्यार्थी उर्जेचा पुनर्वापर, योगा व अन्य विज्ञान विषयक माहिती घेऊन ती इतरांना देतील आणि भविष्यात नाना नानी पार्क मौज मजा, आनंद या मर्यादित हेतू पलीकडे जाऊन विज्ञान विषयक माहितीचे एक अनोखे केंद्र बनेल असा विश्वास आशिष आग्रवाल यांनी व्यक्त केला.
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अस्सखलित इंग्लिश मध्ये या प्रकल्पाची माहिती दिल्याबद्दल आशिष आग्रवाल यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
१०/१२ वर्षांपूर्वी येथे कमिन्स मेगा साईट सुरु करण्याचा निर्णय झाला, त्यावेळी फलटण कोठे आहे याची आपल्याला माहिती नव्हती, पण १०/१२ वर्षात झालेल्या अमुलाग्र बदलामुळे आपल्याला दिल्लीहुन येथे आल्यानंतर पुण्यापेक्षा फलटणचे आकर्षण अधिक असल्याचे नमूद करताना पुण्यात राहतो, तेथे आमचे कार्यालय आहे, मात्र अलीकडे फलटण आपल्याला आपले शहर वाटू लागल्याचे आशिष आग्रवाल यांनी आवर्जून सांगितले.
कमिन्सच्या माध्यमातून एकादा प्रकल्प, उपक्रम राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याच्या यशस्वितेसाठी सर्वार्थाने आणि सर्व स्तरावर प्रयत्न सुरु असतात, त्यासाठी काय करता येईल, काय पूर्तता झाली, काय अडचण आहे याचा अभ्यास सुरु असतो, आणि ध्यास घेऊन तो प्रकल्प पूर्ण केला जातो, त्यावेळी निधी, मान्यता याबाबी गौण असतात आम्ही सर्वजण झोकून देवून त्या प्रकल्पासाठी काम करतो याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असल्याचे आशिष आग्रवाल यांनी सांगितले.
आगामी काळात हे नाते अधिक दृढ होत जाईल, फलटणकरांसाठी सतत नवीन काही करण्याचा आमचा प्रयत्न राहिल त्यातून फलटण एक अनोखे शहर निश्चित बनेल असा विश्वास आशिष आग्रवाल यांनी व्यक्त केला.
फलटण मॉडेल टाऊन प्रकल्प राबविताना तुम्ही येथे एकादी योजना, कल्पना सुचविली तर त्याचा समावेश करण्याची ग्वाही देत कमिन्स इंडिया सी. आर. हेड सौजन्या वेगुरु यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मॉडेल टाऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.
यावेळी गांधी कलर लॅबचे रमणभई गांधी व ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांची समयोचित भाषणे झाली.
फलटण या ऐतिहासिक व सांस्कृतिक नगरीत सन २००७ मध्ये कमिन्सचा प्रवेश भाग्यशाली ठरल्याचे सांगताना गेल्या १७ वर्षात फलटण मॉडेल टाऊन प्रकल्पाच्या माध्यमातून येथे खूप मोठे काम आणि फलटणकरांना उपयुक्त ठरेल असा बदल झाल्याचे निदर्शनास आणून देत १०० हुन अधिक देशांमध्ये विविध औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून कार्यरत कमिन्स जेथे जाते तेथे केवळ स्वतःचा विकास न करता तेथील समाजाचा विकास करणाऱ्या कमिन्स ने फलटण मॉडेल टाऊन प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविताना उभारलेल्या नाना नानी पार्क मध्ये ज्ञान उद्यान (नॉलेज पार्क) उभारुन फलटणकरांना नववर्षाची अनोखी भेट दिल्याचे प्रवीण गायकवाड यांनी आवर्जून सांगितले.
प्रवीण गायकवाड यांनी समारोप व आभार मानले. सरोज बडगुजर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
कार्यक्रमापूर्वी आशिष आग्रवाल यांच्या हस्ते ज्ञान उद्यान (नॉलेज पार्क) चे उद्घाटन करण्यात आले, त्यानंतर आशिष आग्रवाल यांच्या समवेत सौजन्या वेगुरु, प्रवीण गायकवाड, सरोज बडगुजर यांनी ज्ञान उद्यान (नॉलेज पार्क) ची पाहणी केली. तेथे श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना ज्ञान उद्यान (नॉलेज पार्क) च्या एकेका विभागाची माहिती इंग्लिश मधून दिली.
फलटण मॉडेल टाऊन मधील नाना नानी पार्कच्या विस्तार योजनेत ज्ञान उद्यान (नॉलेज पार्क) ची उभारणी डी.वाय.पी. इन्फ्रास्ट्रक्चर, पुणेचे बाळासाहेब पाटील व दत्तात्रय यादव यांनी केली असून त्यांचाही यथोचित सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.