
स्थैर्य, फलटण, दि. ०५ सप्टेंबर : राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा पुढील हप्ता येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ‘एग्रीस्टॅक’ प्रणालीवर नोंदणी करून आपला फार्मर आयडी (Farmer ID) तयार करणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.
शासनाकडून नुकताच या योजनेअंतर्गत निधी वितरणाचा शासन निर्णय जाहीर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची एग्रीस्टॅक नोंदणी झालेली नाही, त्यांना हा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने नोंदणीवर भर दिला आहे.
तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “ज्यांनी अद्याप आपली एग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी. ही नोंदणी योजनेच्या लाभासाठी अनिवार्य असून, त्याशिवाय अनुदान खात्यात जमा होणार नाही.”
केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले जाते.