स्थैर्य, कोळकी दि. 19 : कोळकी (ता.फलटण) येथील किशोरसिंह सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेच्या सातबार्यावर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन ग्रामपंचायत कोळकीचे नाव लावण्यात आले असून त्यामध्ये दुरुस्ती करुन संबंधित तलाठ्यावर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव खरात यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
कोळकी येथील मालोजीनगर येथे 1979 साली स्थापन झालेल्या किशोरसिंह सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना झाली. सर्व्हे नंबर 121/1ब/2 या मिळकतीच्या सातबार्याला संस्थेचेच नाव होते. परंतू शासनाच्या परीपत्रकानुसार तत्कालीन गाव कामगार तलाठी यांनी संस्थेचे नाव सातबार्यावरुन कमी करुन महाराष्ट्र शासनाचे नाव लावले होते. संस्थेच्यावतीने त्याविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केले होते. न्यायालयाने महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक रद्द करुन 7/12 वरील महाराष्ट्र शासनाचे नाव रद्द करुन चेअरमन किशोरसिंह सहकारी गृहनिर्माण संस्था असे नाव दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार तत्कालीन गाव कामगार तलाठ्यांनी फेरफार करताना आदेशानुसार कार्यवाही केली मात्र 7/12 मध्ये महाराष्ट्र शासन या नोंदीस कंस करण्याऐवजी ग्रामपंचायत कोळकी अशी नोंद केली. वास्तविक या जागेशी ग्रामपंचायतीचा काहीही संबंध नाही त्यामुळे ग्रामपंचायतीची नोंद कमी करुन सातबार्यावर महाराष्ट्र शासन ही नोंद करुन त्यास कंस करावा अशी मागणी खरात यांनी केली आहे.
कर्जाचा बोजा कुणाचा?
संस्थेने आजतागायत कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नाही तरीही 7/12 वर बँक ऑफ इंडियाच्या फलटण शाखेचा एक लाख रुपये रकमेचा बोजा दाखविला आहे. हे कर्ज घेतले कुणी? या प्रकाराची चौकशी करावी व 7/12 मध्ये दुरुस्ती करुन संबंधित तलाठ्याविरुध्द कारवाई करावी अन्यथा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करु असा इशाराही खरात यांनी दिला आहे.