दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । फलटण । श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलीत नामदेवराव सूर्यवंशी – बेडके महाविद्यालयाचा भाषा विभाग व नेहरू युवा केंद्र ब्लॉक फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालया मध्ये तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धासाठी स्पर्धक पाठविण्यासाठी फलटण मधील मुधोजी महाविद्यालय, इंजिनियरिंग कॉलेज, हॉर्टीकल्चर कॉलेज, एम. बी. ए. कॉलेज, डी. फार्मसी कॉलेज, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आदी महाविद्यालयास सूचित व आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी आवश्यक कोरोना नियमाचे पालन करण्यात आले होते. सदरील आयोजित तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलीत नामदेवराव सूर्यवंशी – बेडके महाविद्यालयात उत्साहत संपन्न झाल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिलीप शिंदे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणा मधून वक्तृत्व कलेचा उगम, आवश्यकता, महत्त्व, उपयोग, व्यापकता स्पष्ट करून विद्यार्थ्यांना भाषणा संदर्भातील महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच व्यक्तिमत्व विकासामध्ये वक्तृत्वाची भूमिका स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बिचुकले एस.एस. यांनी सादर केले. त्यामध्ये त्यांनी वक्तृत्व स्पर्धेचे औचित्य, महत्व, स्पष्ट करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘देशभक्ती व राष्ट्रनिर्माण’ हा विषय ठेवण्यात आला होता. एकूण १७ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. हिंदी व इंग्रजी या दोन भाषेमध्ये वक्तृत्व सादर करावयाचे होते.
या स्पर्धेच्या परीक्षणाचे कार्य प्रा. सचिन राऊत, प्रा. दिलीप शिंदे व प्रा. बिचुकले एस. एस. यांनी केले. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये अनुक्रमे कु. काजल जाधव, कु. रूचिता बरकडे, कु. पूजा झणझणे विद्यार्थिनिनी यश संपादन केले. त्यापैकी प्रथम क्रमांक विद्यार्थिनीला २१ डिसेंबर सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांसाठी फलटण तालुक्याचे प्रतिनिधित्व देण्यात आले. तसेच पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्र फलटण ब्लॉकचे कार्यवाहक किरण नाझीरकर, प्रतीक खांडेकर, प्रशांत कदम, ओंकार कांबळे, शुभम चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नेहरू युवा केंद्र ब्लॉक फलटण बरोबरच सर्वोदय संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांचेही सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. तेजश्री रायते यांनी केले तर प्रा. आरती शिंदे यांनी आभार मानले.