दैनिक स्थैर्य | दि. २४ डिसेंबर २०२४ | सातारा |
फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत आणि ‘जय हो’च्या घोषात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर विविध मान्यवरांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. याप्रसंगी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
विधानसभेच्या तीन टर्म पूर्ण करून या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी चौकार लगावणार्या आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळणार, याची बर्याचजणांना शाश्वती होती. त्याला कारणही तसेच होते. माण-खटावसारख्या दुष्काळी भागाचा दुष्काळी हा कलंक पुसून हा भाग सुजलाम् सुफलाम् करण्याचे शिवधनुष्य आ. जयकुमार गोरे यांनी लीलया पेलले. त्यांनी विविध योजनांद्वारे या दुष्काळी पट्ट्यांत पाणी आणून जेथे आधी केवळ कुसळे उगवत होती, त्या भागात शेतकरी उसाची लागवड करायला लागले. विरोधकांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपले विकासाचे काम नेटाने सुरूच ठेवले. त्यामुळे मतदारसंघातील मतदारांकडून जलनायक हे बिरुद त्यांनी मिळवले.
दि. १५ डिसेंबर रोजी आमदार जयकुमार गोरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ २३ व्या क्रमांकावर घेतली. मात्र, त्यांना कोणते खाते मिळणार, याबाबत बरेच तर्कवितर्क लढवले जात होते. शेवटी, त्यांनी माण-खटावमध्ये केलेल्या कामांची पोचपावती म्हणून भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. ग्रामविकास मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर दि. २३ रोजी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार दिलीप येळगावकर यांची उपस्थिती होती. त्यानंतर मात्र तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या मंत्री गोरे यांचे तेथेच भल्यामोठ्या क्रेनने उचललेल्या २०-२० फुटी हारांनी तसेच फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत तसेच ‘जय हो’च्या जयघोषात स्वागत करण्यात आले. हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो गाड्यांचा ताफा असलेल्या या ताफ्याने जाणार्या-येणार्या सर्व वाहनधारक, प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले होते.
सारोळा पुलावरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विजयी मिरवणूक सातार्याच्या दिशेने निघाली. मात्र, मंत्री गोरे यांनी नायगाव येथे जात सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन केले. यानंतर शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवड, वाढेफाटा याठिकाणी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने घातलेले अजस्त्र हार, जेसीबींमधून पुष्पवृष्टी, फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतषबाजी अशा या स्वागतामुळे मंत्री गोरेही भारावून गेले.
सातारा शहरात पोहोचताच भारतीय जनता पक्षाच्यावतीनेही त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर खास तयार केलेल्या रथामधून त्यांची भू-विकास बँकेकडून सातार्यातील पोवई नाका शिवतीर्थावर मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी मंत्री गोरे यांच्यासह अन्य मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यानंतर हा ताफा दहिवडीकडे रवाना झाला.