दैनिक स्थैर्य | दि. १० सप्टेंबर २०२३ | फलटण |
नाईकबोमवाडी एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करणार असल्याचे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
वडले (ता. फलटण) येथे शनिवारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य व लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, फलटण-कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, वडले गावचे माजी सरपंच, ज्येष्ठ नेते पोपटराव सोनवलकर, युवा नेते किरण लाळगे, दादा खवळे उपस्थित होते.
वडले गावामध्ये केंद्रीय जलजीवन मिशन योजनेतून १ कोटी ३१ लाख, वडले ते विडणी रस्ता ३ कोटी ५१ लाख, जिल्हा परिषद शाळा भूमिपूजन ९.५० लाख, स्मशानभूमी दुरूस्ती ३.५० लाख, खासदार फंडातून स्ट्रीट लाईटसाठी १.२० लाख अशा विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी वडलेचे माजी सरपंच पोपटराव सोनवलकर व विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन व वांजळे परिसरातील विविध पदाधिकार्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी पोपटराव सोनवलकर यांनी प्रास्ताविकामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक व आभार व्यक्त केले. उर्वरित कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण तालुक्यातील जनतेने मला खासदार केले, तर त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी फलटण तालुक्यामध्ये विविध विकासकामे मार्गी लावलेली आहेत. गेल्या ३० वर्षांमध्ये फलटणच्या राज्यकर्त्यांनी कोणतीही विकासकामे न केल्यामुळे हा फलटण तालुका विकासापासून मागे राहिलेला होता. तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम या तीन वर्षांमध्ये मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. नीरा-देवघरच पाणी असेल, धोम-बलकवडी बारमाही करणे असेल, तालुक्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.
वडले गावाच्या हाकेच्या अंतरावर नाईकबोमवाडी एमआयडीसी मंजूर करून आणली आहे. भविष्यामध्ये फलटण तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी इथून पुढे प्रयत्न करणार आहे. लवकरच एमआयडीसीचे भूमिपूजन होऊन या पंचक्रोशीतील नव्हे तर तालुक्यातील हजारो मुलांना यातून रोजगार उपलब्ध होणार आहे. विविध प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध होतील. तसेच शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला यांनाही यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात बारामतीसारखा विकास फलटणचा करण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी जनतेची साथ अत्यंत महत्त्वाची आहे, असे खासदार रणजितसिंह म्हणाले.
प्रदेश कार्यकारणी सदस्य व लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यावेळी म्हणाले की, भविष्यात फलटण तालुक्यातील जनतेने खासदार रणजितदादांच्या पाठीशी आपले आशिर्वाद उभे करावेत. कारण गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या पद्धतीने फलटणचा विकास झालेला आहे, ते पाहता या तालुक्यातील तरुणांचे भविष्य घडविण्यासाठी दादा काम करीत आहेत. तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. सोनवडीचे सरपंच बाळासाहेब शिंदे, भाडळीचे माजी सरपंच सचिन पिसाळ, पिंपरदचे युवा नेते तुकाराम ढमाळ, तिरकवाडीचे अतुल पवार, बापूराव सोनवलकर, ज्ञानेश्वर लाळगे, योगेश लाळगे, अविनाश लाळगे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.