स्थैर्य, मुंबई, दि. २४: पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची मान उंचावली आहे, अशा शब्दात कौतुक करून, अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तिचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
मंत्री श्री.केदार म्हणाले, अल्फियाला शासनाकडून 3 लाख रोख रक्कमेचा पुरस्कार देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. तसेच पुढील स्पर्धांच्या सरावासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले आहे.
अल्फिया पठाणने गुरुवारी पोलंडमधील किल्स येथे झालेल्या एआयबीए पुरुष आणि महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत उदयोन्मुख चॅम्पियन बनली. ज्युनिअर आशियाई विजेती अल्फिया ने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अनुभवी असलेल्या माल्डोवाच्या डारिया ला तीनही फेऱ्या मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करुन पाचही पंचांना आपल्या बाजूने 5-0 अशा फरकाने निर्णय द्यायला भाग पाडून विजय प्राप्त केला.