
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला २७ मार्च रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २५ मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकस्मित निधनामुळे संपूर्ण राज्यावर आणि राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला आगामी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिली आहे.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस येत्या २७ मार्च रोजी असतो. शहरात त्यांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून दरवर्षी हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या स्वरूपाच्या नियोजनाची तयारीही केली होती.
परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे त्यांनी यंदा कोणताही उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्व. अजितदादा पवार यांच्या अकस्मित निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पदाधिकारी मोठ्या धक्क्यात आहेत. या कठीण आणि शोकाकुल प्रसंगी साधेपणाने राहणे हाच नेत्याप्रती खरा आदर ठरेल, या भावनेतून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला वाढदिवस रद्द केला आहे.
त्यामुळे येत्या २७ तारखेला कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी आणि नागरिकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही मोठे कार्यक्रम आयोजित करू नयेत, हार-तुरे देऊ नयेत किंवा कोणताही उत्सव साजरा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

