
दैनिक स्थैर्य । 31 जुलै 2025 । फलटण । शहरातील आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या नागपंचमीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे रविवार, दि. 27 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजता सजाई गार्डन येथे आयोजन केले.
या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीतील निसर्गपूजेचा आणि सर्प पूजेचा हा सण विद्यार्थ्यांच्या सृजनशील सहभागाने, नृत्य, गीत आणि आनंदोत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास योग विद्या योगा क्लासेसच्या विद्या शिंदे, शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजयमाला गांजारे, पोलीस निरीक्षक अयोध्या घोरपडे, प्रतिभा शिंदे, प्राचार्या डॉ. वैशाली शिंदे, सुचिता जाधव, पूजा बाबर, उपमुख्याध्यापिका सोफिया तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला विद्यार्थिनींनी नागपंचमीचा सणाविषयी पारंपरिक गाण्याने झाली. भारतात विशेषतः ग्रामीण भागात सर्पपूजेचा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात सादर केलेले नृत्य म्हणजे भक्ती, संस्कृती आणि आनंद यांचं एकत्रित दर्शन होते.
या कार्यक्रमानंतर महिला संघानी ’पिंगा ग.., पोरी पिंगा ’हे गीत म्हणजे स्त्रीसौंदर्य, उत्सवप्रियता आणि सवाष्णांच्या आनंदाचा उत्सव. कोजागिरी किंवा श्रावणात पारंपरिक फेर धरून नाचणार्या महिलांचा हा उत्सव कलाकारांनी इतक्या समरसतेने साकारला की क्षणभर प्रेक्षकही त्या फेरात सामील झाल्यासारखे वाटले. त्यानंतर ‘घागर घुमू दे’ हे लोकगीत म्हणजे स्त्रीच्या श्रमाचे आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. श्रावण महिन्यातल्या सरींमध्ये पाणी आणायला गेलेल्या तरुणींच्या मनात दाटून आलेल्या भावना, त्यांच्या नादात नाचणार्या घागर्या. हे दृश्य नृत्यातून उभं राहिलं. यानंतर इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘मंगळागौर’ नृत्य म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा शुद्ध सुवास. मंगळागौर म्हणजे नवविवाहित महिलांसाठीचा एक पारंपरिक सण, जिथे गाणी, फुगड्या, झिम्मा यांचा समावेश असतो. मुलींनी अतिशय रंजकतेने आणि आत्मीयतेने हे सादरीकरण साकारले. यानंतर नृत्यशक्ती महिला संघ यांनी सादर केलेले ’नाच ग घुमा ’हे गाणं म्हणजे आनंदाचा, मुक्तपणाचा आणि स्त्री-शक्तीचा जल्लोष होता.
इयत्ता पहिली लक्ष्मीनगर छोट्या चिमुकल्यांनी दिलेले नृत्य सादरीकरण हे निरागसतेने भरलेलं होते. त्यांच्या नृत्यात गोडवा आणि सहजता होती, जी प्रत्येकाच्या चेहर्यावर हास्य फुलवून गेली.
कार्यक्रमाच्या शेवटी, शाळेच्या प्राचार्या व शिक्षकवर्गाने सादर केलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या गीतावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव घडवून आणला. शिक्षकवर्ग, महिला संघ, पालक आणि विद्यार्थ्यांनी मिळून साकारलेल्या या कार्यक्रमातून परंपरेची गोडी नव्या पिढीपर्यंत पोहोचली. या कार्यक्रमास नृत्यदिग्दर्शक प्रशांत भोसले यांनी मार्गदर्शन केले. नवनाथ कोलवडकर सूत्रसंचालन केले.