दैनिक स्थैर्य | दि. ३० सप्टेंबर २०२३ | फलटण |
तरस जातीच्या प्राण्याचा सध्या फलटण शहरानजीक वावर दिसून येत आहे. काही लोक या तरसाचे फोटो, व्हिडियो व्हॉटस्अॅपवर चुकीच्या पध्दतीने वायरल करत आहेत, पण या विषयाच्या मुळाशी जाऊन खरा विषय समजून घेतला पाहिजे.
या विषयाच्या मुळाशी गेलो तर असे समजून येते की, गेल्या ४-५ वर्षांमध्ये फलटणजवळील डोंगरावर वारंवार वणवे लावण्याचे प्रकार घडून आले आहेत. ज्यामध्ये असंख्य वन्यजीव मृत होत आहेत आणि यामुळे बर्याच वन्यजीवांचे नैसर्गिक आदिवास नष्ट होत चालले आहेत. तसेच कोंबड्यांच्या पोल्ट्रीचे मेलेले पक्षी, हॉटेल, चिकन दुकानातून उरलेले मांस, पाळीव व बेवारस मृत झालेली जनावरे यांचा व्यवस्थित निपटारा न केल्याने त्याकडे आकर्षित होऊन हा प्राणी अन्न खाण्याच्या शोधात शहराकडे वळत आहे आणि ह्या घटनांचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे.
खरं पाहायला गेले तर हा प्राणी खूप शांत स्वभावाचा असून मानवांवर हल्ले केलेल्या घटनांचे पुरावे फारसे आढळून येत नाहीत. तरस हा प्राणी फार पूर्वीपासून मनुष्यवस्तीच्या आसपास वावरणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. पण, जसे पूर्वीचे लोक निसर्गाला आणि वन्यजीवांना जोडलेले होते, तसे आजची माणसे या सर्व बाबींपासून अलिप्त आहेत. ज्यामुळे आज असे अज्ञान दिसून येते की, हा वन्यप्राणी आपल्यासाठी धोकादायक आहे. पण, हे खरंच सत्य आहे का? अशा गोष्टींची योग्य शहानिशा न करता या प्राण्याला दोष दिला जातो व मनुष्यांसाठी धोकादायक आहे, अशा अफवा पसरवल्या जात आहेत.
तरस हा प्राणी निशाचर (रात्री आढळणारा) असून निसर्गात सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. ज्याध्ये तो मेलेलं, कुजलेलं आणि सडलेलं मांस खाऊन जगतो व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करतो. यातून माणसांना पण होणारे बरेचसे संसर्गजन्य आजारांवर आळा बसतो आणि सध्या हा प्राणी जरी शहराकडे आला असला तरी तो काही दिवसांनी पुन्हा त्याच्या नैसर्गिक आदिवासात निघून जाईल आणि त्यासाठी आपण सुध्दा संयमाने हा विषय हाताळला पाहिजे. चुकीच्या पध्दतीने हा प्राणी प्रसारमाध्यमातून आज बदनाम होत आहे, ही खूप दुर्दैवी घटना आहे.
हा प्राणी मानवावर कधीच हल्ला करत नाही, तरीपण अपुरी माहिती आणि अज्ञानापोटी आज लोक समाजापुढे अशा वन्यजीवांना चुकीच्या पध्दतीने सादर करत आहेत. जरी हा प्राणी आपल्या नजीकच्या परिसरात दिसल्यास घाबरून न जाता कोणत्याही प्रकारची गर्दी व आरडा-ओरडा न करता त्याला तेथून बाहेर जाण्यास मार्ग मोकळा करावा.
नेचर अॅण्ड वाईल्डलाईफ वेलफेअर सेासायटी, फलटणतर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करत आहोत की, घाबरून न जाता कोणत्याही अशा अफवांवर आणि चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता अशा वन्यजीवांबद्दल योग्य माहिती हवी असल्यास संस्थेला किंवा वनविभागाला संपर्क करावा. अधिक माहितीसाठी ९०११५७२६८९, ९८६०८५००१९, ९४२१५७१७०९ संपर्क साधावा.