शेते येथील युवकाचा मृत्यू बाबत गूढ; मृतदेहावरील अघोरी कृत्यामुळे नरबळी घातपाताची शक्यता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२२ । जावळी । जावळी तालुक्यातील शेते गावातील अविनाश मेंगळे या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी मेढा पोलिस स्थानकामध्ये केला आहे. यासंदर्भात सदर मृत्यू अकस्मात नसून घातपात तथा नरबळी असल्याचा संशय आरपीआयचे संजय गाडे व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपाने जावळी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान कुटुंबीयांनी व तालुक्याचे अध्यक्ष संजय गाडे यांनी दिलेल्या निवेदनात प्रमाणे मृत युवक अविनाश मेंगळे व त्याचे दोन मित्र सत्यवान भोसले आणि निलेश साळुंखे बाहेर जाऊन येऊ म्हणून घरातून अविनाशला घेऊन गेले. दुपारच्या वेळेस पत्नी रेश्मा हिने अविनाशला फोन केला. अविनाशने एक तासात घरी येतो असे सांगितले. मात्र दोन तासाने अविनाश याचा मृतदेह त्याच्या मित्र सत्यवान भोसले आणि निलेश साळुंके या दोघांनी घरी आणून दिला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अविनाशचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याचा मृत्यू अटॅकने झाला असल्याची माहिती संबंधित मित्रांनी पत्नीला दिल्यानंतर पत्नी व सासू बेशुद्ध पडली व त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब गोंधळून गेले. अचानक अविनाशचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे मित्र सत्यवान भोसले आणि निलेश भोसले यांनी घाईघाईने अंतिम विधी उरकून घेतला असल्याची माहिती निवेदनाच्या माध्यमातून त्याच्या पत्नीने दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अविनाश मेंगळे यांचा मृतदेह धोम उजव्या कॅनॉलमधून बाहेर काढत असल्याचे सत्यवान भोसले व निलेश साळुंखे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सत्यवान भोसले आणि निलेश साळुंखे हे पहाटेच्या सुमारास घरातून फरार झाले. त्यामुळे संशयास्पद वातावरण निर्माण होत आहे तसेच मयत अविनाश मधुकर मेंगळे याच्या डाव्या पायाची संपूर्ण बोटाची नखे जाळून उपसून काढल्याचे फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नरबळीचा प्रकाराला दुजोरा मिळत आहे. सत्यवान भोसले व नीलेश भोसले यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची तात्काळ चौकशी करावी म्हणून त्यांची पत्नी रेश्मा अविनाश मेंगळे तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी मेढा पोलिस ठाण्यामध्ये निवेदन दिले आहे. याची तात्काळ पोलिसांनी चौकशी करून नेमका हा खून आहे घातपात आहे की नरबळीचा प्रकार आहे याचा खुलासा करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!