स्थैर्य, दि.७: देशात कोरोनाच्या
फैलावाचे सत्र सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमधील एलरू शहरात एक रहस्यमय
आजार पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रहस्यमय आजारामुळे लोक
मोठ्या प्रमाणात बाधित होत असून, काल एका रात्रीत सुमारे १४० रुग्ण सापडले
आहेत. दरम्यान, हा नेमका कोणता आजार आहे. याचा उलगडा डॉक्टरांनाही झालेला
नाही.
चिंताजनत बाब म्हणजे रुग्णांची संख्या
वाढण्यामागचे कारण डॉक्टरांनाही कळलेले नाही. गेल्या शनिवारी एलुरू शहरात
चक्कर आणि मळमळ या लक्षणांनंतर मुलांसह एकूण १८ जण बेशुद्ध झाले होते.
मात्र आजारी पडल्यानंतर काही क्षणा्ंतच ते बरे झाले होते. वन-टाऊन
क्षेत्रात अचानक घडलेल्या या घटनेनंतर कुठलातरी रहस्यमय आजार पसरल्याची
चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली होती.
दरम्यान, या प्रकारानंतर राज्याचे
उपमुख्यमंत्री (आरोग्य) एकेके श्रीनिवास यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एलुरू शहरातील सर्व परिस्थिती सामान्य आहे तसेच घाबरण्यासारखे काही नाही,
असे त्यांनी स्पष्ट केले. काही जणांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी
पाठवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. संबंधित रुग्णांचे सिटीस्कॅन
करण्यात आले असून, त्यामध्ये सर्व काही सामान्य असल्याचे दिसून आल्याचे
पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे संयुक्त जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांनी
सांगितले. तसेच हा प्रकार विषाणूजन्य संसर्गाचा असू शकतो, अशी शक्यताही
त्यांनी वर्तवली.