स्थैर्य, सातारा, दि.३०: एक आमदार म्हणून मी माझ्या सातारा- जावली मतदारसंघाच्या विकासासाठी, मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. अनेक प्रश्न मार्गी लावून मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचवली आहे, हे आपण सर्वांनी पहिले आहे. काही लोक काडीचे काम करत नाहीत मात्र फुशारक्या मारून गैरसमज पसरवण्याचे काम करत असतात. त्यांच्याकडे मी फारसे लक्ष देत नाही. दिलेला शब्द पाळणं, तो पूर्ण करणं हीच माझी कामाची पद्धत आहे आणि हे जावलीकरांनी पाहिलं आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
मेढा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मेढा नगर पंचायतीच्या माध्यमातून २ कोटी पेक्षा जास्त निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे उदघाटन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते आणि ज़िल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले. यामध्ये चांदणी चौक ते देशमुख आळी रस्ता व गटर, चांदणी चौक ते लक्ष्मी मंदिर रस्ता व गटर,चांदणी चौक ते कुंभारवाडा रस्ता, श्री स्वामी समर्थ मंदिराजवळील साकव पूल व रस्ता, ओतारी घर ते तांबोळी घर बंदिस्त गटर, चंद्रमानगर मधील डांबरीकरण, गटर, स्ट्रीट लाईट, धबधबा रोड साकव पूल, आगुंडे घर ते धनावडे घर रस्ता, अहिल्यादेवी नगर मधील स्ट्रीट लाईट, प्रभाग क्र १७ मधील रस्ता आदी कामांचा समावेश आहे. याप्रसंगी समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, नगराध्यक्ष अनिल शिंदे, उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, उद्योजक विजय शेलार, भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा गीता लोखंडे, श्रीहरी गोळे, रामभाऊ शेलार, शिवाजी गोरे, बांधकाम सभापती वंदना सपकाळ, आरोग्य सभापती संजना सावंत, नगरसेवक नारायण देशमुख, विकास देशपांडे, शशिकांत गुरव,सुनील तांबे, सुनीता तांबे, दीपाली शिंदे, कल्पना जवळ, शुभांगी गोरे, दत्तात्रय वारागडे, संतोष वारागडे, सुजित जवळ, नंदकुमार गाडगीळ, बाळासाहेब सपकाळ, एन. के. धनावडे, राजू सावंत, दिलीप कुंभार आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, आघाडी सरकार असताना मेढा ग्रामपंचातीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. या नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळत नव्हता. नगरपंचायतीच्या सक्षम कारभारासाठी मुख्याधिकारी अत्यावश्यक असतो. आपण मुख्याधिकारी आणले. विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली आणि पुढेही लावणार आहे. मी एखाद्या कामाचा नारळ फोडला कि ते काम पूर्ण होणारच यात शंका नाही आणि त्याची प्रचिती सर्वांनाच आहे. आजच्या कार्यक्रमातील काही कामांना निधी नाही आणि आमदार नारळ फोडणार अशा फुशारक्या काही स्वयंघोषित नेत्यांनी मारल्या आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले. या कामांसाठी मी निधी मिळवण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे त्या नेत्यांनी निधी कोठून येणार याची काळजी करू नये, असा टोलाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला. दरम्यान, निधी उपलब्ध झालेली कामे लवकर पूर्ण होतील आणि ज्या कामांसाठी निधी आवश्यक आहे त्यासाठी निधी मिळवू आणि तीही कामे मार्गी लावू असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. सातारा महाबळेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्याचा फायदा मेढा शहराला होणार आहे.मेढा हे आता गाव राहिले नसून शहर झाले आहे. आगामी काळात नगरपंचायतीची नगर पालिका होईल आणि मी आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक मिळून या शहराचा विकास झपाट्याने करू. त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.