स्थैर्य, विडणी, दि. ०४ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात फलटण तालुक्यातील विडणी गावाने सहभाग घेतलेला आहे. वरील पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने कामे केली जाणार आहे. राज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्वानुसार चांगली कामे करणाऱ्या गावांचा, नगरपरिषदांचा व पालिकांचा गौरव केला जाणार आहे. १५०० गुणांचे हे अभियान असणार आहे. पृथ्वी ६०० गुण, वायू १०० गुण, जल ४०० गुण, अग्नी १०० गुण, आकाश ३०० गुण, एकूण १५०० गुण असे मिळून १५०० गुण या अभियानासाठी आहेत, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे यांनी दिली.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी गुळवे, ग्रामविकास अधिकारी दिलीप ननावरे, सचिव सहदेव शेंडे, विडणी गावच्या सरपंच सौ. रुपाली अभंग, विडणी गावचे उपसरपंच नवनाथ पवार, विडणी गावचे ग्रामविकास अधिकारी डी. बी.चव्हाण, विडणी गावचे पोलिस पाटील धनाजी नेरकर, प्राचार्य पी. टी. अभंग यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. या गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून हे अभियान सुरू झालेले आहे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे अशा गावांची निवड या अभियानात केली जाणार आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश ही पंचतत्त्वे अभियानासाठी आधारभूत ठेवण्यात आली आहे. तरी या सर्व पंचतत्त्वाची मूल्ये राखून विडणी गवव नक्कीच जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकवेल असा विश्वास श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी या वेळी व्यक्त केला.