‘सुखा पाटील’ स्टेटस भीमदेव बुरुंगलेंसाठी नव्हतेच; रोख निलेश बुरुंगलेंकडे होता – श्रीमंत रघुनाथराजे


स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते प्रा. भीमदेव बुरुंगले यांच्या पक्षप्रवेशानंतर “राजे गटातील सुखा पाटील गेला” या ठेवलेल्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळावर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी ‘स्थैर्य’कडे खुलासा केला आहे. सदर स्टेटस हे प्रा. भीमदेव बुरुंगले यांच्यासाठी नसून, त्यांचे पुत्र निलेश बुरुंगले यांना उद्देशून चेष्टेने ठेवले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. भीमदेव बुरुंगले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रघुनाथराजे यांनी ठेवलेल्या या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. बुरुंगले यांच्यावरच ही अप्रत्यक्ष टीका असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत श्रीमंत रघुनाथराजे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

‘स्थैर्य’शी बोलताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले, “राजे गटामध्ये आम्ही बहुतांश मंडळी निलेश बुरुंगले यांना त्यांच्या आहारामुळे चेष्टेने ‘सुखा पाटील’ असे म्हणत असू. हा आमच्यातील एक विनोदाचा भाग होता. प्रा. भीमदेव बुरुंगले यांना आम्ही कधीही त्या नावाने संबोधलेले नाही. त्यामुळे माझ्या स्टेटसचा संबंध भीमदेव बुरुंगले यांच्याशी जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे.”

श्रीमंत रघुनाथराजे यांच्या या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणाला एक अनपेक्षित वळण मिळाले आहे. भीमदेव बुरुंगले यांच्या पक्षबदलाच्या पार्श्वभूमीवर ठेवलेल्या या स्टेटसच्या टायमिंगमुळे जो राजकीय अर्थ काढला जात होता, तो आता चुकीचा ठरला आहे.

एका ज्येष्ठ नेत्याच्या पक्षबदलानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात या स्टेटसने अधिकच भर घातली होती. मात्र, श्रीमंत रघुनाथराजे यांनी केलेल्या खुलाशामुळे यावरील गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!