स्थैर्य, फलटण, दि. ०१: मराठी भाषेचे महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन आज ६१ वर्षे पूर्ण झाली. १०४ हुतात्म्यांच्या बलिदानातून हे राज्य निर्माण झाले. हे नव्या पिढीला ज्ञात नाही. एक जनआंदोलन त्यासाठी झाले हे आजही विस्मृतीच्या पडद्याआड गेले आहे. जे तेजस्वी नेते निर्माण झाले. वृद्ध, तरुण, स्रिया या सार्यांनी त्यात भाग घेतला. पत्रकारांच्या आणि शाहीरांच्या बुलंद आवाजाने त्याला साथ दिली. सर्वजण एक दिलाने लढले. सत्तेच्या खुर्च्या नरमल्या. पंडित नेहरू, मोरारजी देसाई, स.का.पाटील हरले. भांडवलशहा नामोहरण झाले. या लढ्यातील महारथींनी सर्वस्व पणाला लावून मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्रासाठी योगदान दिले.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमागील थोडा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भाषावार प्रांतरचनेचा काँग्रेसने प्रथम जोरदार पुरस्कार केला. भाषिक प्रांतरचनेच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी १९४८ मधे दार कमिशन नेमले. त्यांनी एक भाषीक राज्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होतील असे भासवून भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न खुंटीवरवर टांगून ठेवला त्यानंतर १९५५ साली नेमलेल्या फाजलअली कमिशनमुळे महाराष्ट्र, गुजरातसह द्विभाषिक राज्याची निर्मिती करण्यात आली. कानडी भाषिकांसाठी कर्नाटक, तामिळ भाषेसाठी मद्रास, बंगाल भाषीकासाठी बंगाल अशी भाषावार प्रांतरचना करून महाराष्ट्राची घोर निराशा केली. यातूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निर्माण झाली. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू हे निरनिराळ्या कारणांसाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रतिकूल होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने आधुनिक रामशास्त्री चिंतामणराव देशमुख यांच्या रूपाने पाहीला. शब्दांच्या गोळ्यांनी बंदुकीच्या गोळ्यांना हरवणारा आचार्य अत्रे यांच्या सारखा बलदंड पत्रकारही पाहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अनेक नामवंत नेत्यांचा सहभाग होता. तसेच अनेक अनामिक कार्यकर्त्याचे ही अनमोल योगदान होते. सेनापती बापट, शंकरराव देव, क्रांतिसिंह नाना पाटील, एस एम जोशी, श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे, शंकरराव मोरे, भाई ऊद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, श्री.कृष्णराव धुळप, गणपतराव देशमुख, डॉ. श्रीराम नरवणे अशा थोर नेत्यांनी महाराष्ट्राला मुंबई तर मिळवून दिली. तसेच भारताच्या नकाशावर महाराष्ट्राचे नावही झळकवले. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, आत्माराम पाटील, पिराजी सरनाईक यांनी अक्षरशहा: महाराष्ट्र हलवला व पेटवला. ज्याची बुद्धी शाबूत आहे व ज्याला सत्त्याची थोडी तरी चीड आहे अशी व्यक्ती कबूल करेल की महाराष्ट्रातील जनतेने जो लढा लढवला त्याला इतिहासात तोड नाही. हा सर्व लढा केवळ सत्यासाठी व अन्याया विरुद्ध होता. या चळवळीत शाहिरांनी असंख्य पोवाडे, गोंधळ रचले. त्यात त्यांच्या प्रतिभेचा विलास दिसून आला. तो पाहिला म्हणजे या चळवळीने मराठी साहित्याला शाहिराच्या रूपाने मोठी देणगी दिली आहे. हे नक्कीच लक्षात येते.
संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये प्रजासमाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मजदूर किसान पक्ष, हिंदू महासभा, जनसंघ अशा अकरा विरोधी पक्षाचा समावेश होता. मुंबईत कम्युनिस्ट आणि नागरी भागात प्रजा समाजवादी व ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षाने संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीची रणधुमाळी माजवलेली होती. मराठी मनाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न पाहिले व ते रक्ताच्या सड्यांनी साकार केले. मराठी माणसावर दंगलीचे आरोप झाले. फ्लोरा फाउंटन मुंबई येथे मोरारजी देसाईंच्या सरकारने आंदोलकावर गोळीबार केला. त्यात १०४ हुतात्मे अमर झाले. चिडलेल्या निदर्शकांनी गोळ्यांचा वर्षाव करणाऱ्या पोलिसांना सळो कि पळो करून सोडले. सूडबुद्धीने केलेल्या गोळीबारात अनेक हुतात्म्यांची नावे संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या या चळवळीत माझे मामा व सासरे आमदार कै. चंद्रकांत नाईक निंबाळकर व कै. मानसिंगराव नाईक निंबाळकर (वैराग) यांनी आपल्या सहकार्यांसह तीन महिने तुरूंगवास भोगून योगदान दिले. त्यांची आज प्रकर्षाने आठवण आल्याशिवाय रहात नाही.
मागील साठ वर्षात राज्याने अशी प्रगतीची कास धरली की आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. व्यापार, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात आपले महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे चित्र पाहावयास मिळते. महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा वेगवेगळ्या पातळीवर लढला गेला. या लढ्यात कामगारांनी घेतलेला सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांच्या या सहभागामुळेच हा लढा खऱ्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला. याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर, त्याच दिवशी महाराष्ट्र दिना बरोबरच कामगार दिनही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
२१ नोव्हेंबर इसवी सन १९५६ या दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात खुप तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्या-मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संघटनामुळेच कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले होते. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदर कडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटन कडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. पण अढळ सत्याग्रहीमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश, मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मा झाले. या शहिदांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने विचार करून शेवटी १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ. स. १९६५ मध्ये त्याजागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे स्वप्न साकार करणार्या ज्या वीर सुपुत्रांनी आणि सुकन्यांनी आपल्या बलिदानाने व अपूर्व त्यागाने हा सोन्याचा दिवस दाखवला त्या सर्वांना आम्हा मराठी जनतेचा मानाचा मुजरा.
– डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर,
पुणे