
दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा- जावली मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरु ठेवून प्रत्येक गाव, वाडी- वस्ती विकासाच्या प्रवाहात आणली आहे. ग्रामस्थांच्या सूचनेनुसार त्या-त्या गावातील प्रश्न मार्गी लावण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून आगामी काळात प्रत्येक गावाचा कायापालट होईल, असा आश्वासक शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
डबेवाडी ता. सातारा येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार हा प्रश्न सोडवला. या रस्त्याचे भूमिपूजन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, डबेवाडीच्या सरपंच उमा माने, सदस्य रघुनाथ भोसले, संजय घाडगे, नलिनी माने, स्नेहल कदम, शामल भोसले, संभाजी शेळके सर, द्या शितोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा आणि जावली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना या दोन्ही तालुक्यातील सर्वप्रकारचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोट्यवधींचा निधी सातत्याने उपलब्ध करून दिला आहे. विविध प्रकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून प्रत्यके गावात विकासगंगा पोहचवली आहे. गाव तिथे डांबरी रस्ता हि संकल्पना राबवून प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येत आहेत. निवडणुकीपुरते राजकारण या सूत्राचा अवलंब करून कोणताही गट- तट असा भेदभाव न करता संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला असून यापुढेही प्रत्येक गावातील प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.