दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२३ । फलटण । 1996 साली यांचे वडील चुकून निवडून आले होते. त्याच प्रमाणे 2019 साली हे चुकून निवडून आले आहेत. ते काही फलटण तालुक्यामुळे निवडून आलेले नाहीत. तर ते सोलापूर जिल्हा विशेतः माळशिरस तालुक्यामुळे निवडून आले आहेत. आता आगामी काळामध्ये काहीही झाले तरी सुद्धा कोणत्याही निवडणुकीला “तू फक्त उभाच रहा; तुला आता पाडणारच आहे”; असा इशारा सुद्धा यावेळी खासदार रणजितसिंह यांचे नाव न घेता श्रीमंत रामराजे यांनी लगावला. आता आगामी काळामध्ये मला तुम्ही फक्त दिल्लीत सोडा; बघा मी काय – काय करून येतो. दिल्लीत जाण्याची माझी पाहिल्यापासूनची इच्छा आहे, असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात होता. या प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड, आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, महानंदाचे संचालक डी. के. पवार, फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, संचालक महादेव माने, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, दत्तात्रय गुंजवटे, सौ. रेश्मा भोसले, जेष्ठ नेते दादासाहेब चोरमले, कोळकीच्या माजी सरपंच सौ. रेशमा देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार सर्व विधानसभा मतदारसंघ निहाय बुथ कमिट्या सक्षम करण्याचे काम सर्वत्र सुरू असतानाच या बुथ कमिटीच्या माध्यमातून ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व आमदारकी या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारास या बुथ कमिटीच्या माध्यमातून तयार केलेली यंत्रणा ही कायमस्वरूपी मिळणार असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम सुरू असून भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीतील रणनीतीला तोडीस तोड उत्तर देणारी यंत्रणा बुथ कमिटीच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये उभी करणार आहे. आमच्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाकडून भाजपामध्ये गेलेली नेतेमंडळीच भाजपाला संपविणार असून तालुक्यातील स्थानिक पातळीवर आमचेच दोन वेगवेगळे गट तयार झालेले आहेत त्या दोन्ही गटांना एकत्रित आणण्यासाठी आपणाला प्रयत्न करावा लागणार आहे, असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
खरंतर १९९६ साली आपल्या तालुक्यातील निवडून आलेले खासदार पुन्हा ते अनेकदा उभे राहिले मात्र त्यांना जनतेने कधीच स्वीकारले नाही व नाकारलेच हा इतिहास माढा लोकसभा मतदारसंघातून अपघाताने निवडून आलेल्या खासदारांबाबतीत आपणाला करावयाचा आहे. यासाठी आपण सर्वांनी तयार राहून मागील लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले खासदारांनी आता कोणत्याही पक्षातून निवडणुकीला आमच्या समोर यावे त्यांना मी पाडणारच आहे. त्यांनी फक्त उभे रहावे मी त्यांना पाडून दाखवतोच असे आव्हानच श्रीमंत रामराजे यांनी यावेळी देवून श्रीमंत रामराजे म्हणतात गेल्या काही वर्षापासून फलटणचे राजकारण आम्ही एकतर्फी करून दाखवले होते. असेच एकतर्फी राजकारण करण्यासाठी ताबडतोब बूथ कमिट्यांची रचना करून क्रियाशील बुथ कमिट्या तयार कराव्यात व यामुळे बुथ कमिटीच्या माध्यमातून आपणाला पुढील निवडणुकीतील कामकाज सोपे होणार असल्याचे सांगितले आज पाणी प्रश्नावर हे सगळे लोक बोलू लागले आहेत. पण सातारा जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर सगळे कष्ट आमचेच आहे हे ही विरोधकांनी लक्षात ठेवावे हिम्मत असेल तर खासदारांनी फक्त 372 आर्टिकल काढून पाणी प्रश्नाची भाषा करावी असेही शेवटी श्रीमंत रामराजे आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने इत्यादी मान्यंवरांची समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम नलवडे, जयकुमार इंगळे यांनी केले तर आभार विजयसिंह जाधव यांनी मानले.