स्थैर्य, सोलापूर, दि.१२: माझे मूल माझी जबाबदारी आणि माझा विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या अभियानाचे आज श्री. भरणे यांच्या हस्ते होटगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, पंचायत समिती उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड उपस्थित होते.
श्री.भरणे म्हणाले, तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त लागण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरु केलेले माझे मूल माझी जबाबदारी आणि माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सुमारे पावणे दहा लाख मुलांची तपासणी केली जाणार आहे.
होटगी परिसरास स्वतंत्र पोलीस स्टेशनच्या मागणीबाबत विचार केला जाईल. तसेच आशा वर्करच्या मानधनाच्या मागणीबाबत विचार केला जाईल, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.
आमदार श्री. देशमुख यांनी होटगी परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अभियानातून पावणे दहा लाख मुलांची तपासणी करणार आहे. अशा प्रकारे राज्यात पहिल्यांदाच अभियान राबविण्यात येत आहे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, शिक्षण अधिकारी संजय राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख आदी उपस्थित होते.