दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२२ । सातारा । महाराष्ट्रात महा विकास आघाडीच्या नाकर्ते पणामुळे तसेच राज्य सरकारमधील नेत्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसी बांधवांना आरक्षण मिळू शकत नाही , मध्यप्रदेश सरकारला जे जमले ते महाराष्ट्रात होत नाही कारण ओबीसी आरक्षण देण्याची ठाकरे सरकारची मानसिकताच नाही अशी घणाघाती टीका ओबीसी मोर्चा भाजप प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केली.
ओबीसी बंधू-भगिनींना आरक्षण मिळावे यासाठी शासनावर दबाव आणण्याकरिता भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव श्री विक्रमजी पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. योगेशआण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा येथे आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात आले, यावेळी महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजप कटिबध्द असल्याचे योगेश टिळेकर यांनी बोलताना सांगितले. पंधरा मिनिटाच्या रास्ता रोको नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.