
स्थैर्य, सातारा, दि. 10 ऑक्टोबर : औंध येथील यंदाचा 85 वा औंध संगीत महोत्सव शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता. 11) मोठ्या दिमाखात तीन सत्रांमध्ये साजरा केला जाणार आहे, अशी माहिती औंध संगीत महोत्सवाच्या निमंत्रक अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांनी दिली.
यंदाचा औंध संगीत महोत्सव तीन सत्रात आयोजित केला जाणार आहे. सकाळी साडेआठ वाजता जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. त्यानंतर प्रथम सत्रातील गायनाची सुरुवात अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी या भगिनी करणार आहेत. त्यानंतर सरोद वादन अभिषेक बोरकर करणार आहेत. तबला वादन राजेंद्र अंतरकर करणार आहेत, तसेच पहिल्या सत्राची सांगता अमिता पावगी गोखले यांच्या गायनाने होणार आहे. दुसर्यासत्राची सुरुवात दुपारी अडीच वाजता प्राजक्ता मराठे यांच्या गायन, सुधीर नायक यांचे एकर संवादिनी वादन, पंडित अरुण कशाळकर यांचे गायन, त्याचबरोबर कार्यक्रमाचे आकर्षण असलेल्या कथ्थक नृत्याचे सादरीकरण अनन्या गोवित्रीकर करणार आहेत. त्याचबरोबर सायंकाळी चार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रियाझ स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. यावेळी महा मेट्रोचे एमडी श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शेवटच्या सत्रात रात्री दहा वाजता पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन होणार आहे. यावेळी त्यांना तबला साथ पद्मश्री पुरस्कार प्राप्त पंडित सुरेश तळवलकर करणार आहेत. त्यानंतर पार्थ भुमकर व रोहित खवले यांची पखवाज जुगलबंदी होणार आहे. शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे गायनाने औंध संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
सातारा जिल्ह्यासह औंध परिसरातील संगीताची आवड असणार्या विद्यार्थ्यांसाठी गायिका व विदुषी अपूर्वा गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 10) संगीत कार्यशाळेचे आयोजन औंध येथील दत्त मंदिरात केले जाणार आहे, अशी माहिती श्रीमती जोशी यांनी दिली.