लता दीदींच्या जयंतीदिनी २८ सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही श्री. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून त्याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. या समितीने  यावर्षी सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहवाल लवकर सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यास  जागेअभावी अडचण येऊ नये म्हणून पु.ल.देशपांडे कला अकादमी मध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दि.२८ सप्टेंबर रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांची जयंती आहे, यानिमित्त यावर्षी पहिली बॅच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!