मशरूम शेती : आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


राज्य व केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास निधीमधून आठ लाखाचे अनुदान घेऊन वाळवा तालुक्यातील कामेरी येथील शेतकरी दादासो आत्माराम पाटील यांनी शिव प्रेरणा मशरूम आणि कृषी उत्पादने फर्म सुरू केली. यासाठी त्यांनी हिमाचल प्रदेशातील ICAR-DMR सोलन येथे मशरूम लागवड तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग करून त्यांनी यशस्वी मशरूम शेती केली आणि शेतकऱ्यांसाठी मशरूम शेती आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत असल्याचा मार्ग दाखवून दिला.

मशरूम शेती बाबत माहिती देताना श्री. पाटील यांनी सांगितले, शिवप्रेरणा मशरूम आणि कृषी उत्पादने फर्ममध्ये 16 तांत्रिक आणि गैरतांत्रिक मजुरांच्या सहाय्याने कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी बग्यास, कोंबडीचे खत, गव्हाचा कोंडा, जिप्सम, एरिया हे सर्व एकत्र करून ओले केले जाते. कंपोस्ट खत निर्मिती हा यातील महत्त्वाचा भाग आहे.

कंपोस्ट खत निर्मितीनंतर फेज एक मध्ये भरलेले सर्व साहित्य तीन दिवस ठेवले जाते. कंपोस्ट मिश्रण कंडिशनिंग आणि पाश्चरायझेशनसाठी सहा-सात दिवस भरले जाते. कंपोस्ट 56 ते 59 डिग्री सेल्सियस तापमानात चार ते सात तासासाठी पाश्चराईजड केले जाते. पाश्चरायझेशननंतर कंपोस्ट 25 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमानात थंड केले जाते. आणि स्पॉनिंग केले जाते. स्पॉनचा वापर 0.5 ते 0.75 टक्के दराने केला जातो.

स्पॉनिंगनंतर कंपोस्ट पॉलीथीनच्या पिशव्यांमध्ये भरले जाते आणि स्पॉनरनसाठी  खोल्यांमध्ये हलवले जाते. यासाठी 23 ते 25 सेल्सिअस तापमान, 85 ते 90 टक्के आद्रता आणि C02-10000ppm पेक्षा जास्त  आवश्यक आहे. स्पॉनरन पूर्ण करण्यासाठी 12 ते 14 दिवस लागतात. C02 कमी करण्यासाठी ताजी हवा दिली जाते या टप्प्यात तापमान 16 ते 18 डिग्री सेल्सिअस आणि आद्रता 80 ते 85 टक्के असते ताजी हवा दिल्यानंतर मशरूम काढण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात एका खोलीतून 30 दिवस मशरूम काढता येते.

दहा किलोच्या एका बॅगमध्ये 50 ते 100 ग्रॅम स्पॉन टाकल्यानंतर यातून दीड ते दोन किलो मशरूमचे उत्पादन मिळते. एका बॅच मधून सरासरी दीड टन उत्पादन मिळू शकते. एक महिन्यात तीन बॅच मधे चार ते पाच टन उत्पादन मिळते. मुंबई, बेंगलोर यासह मोठ्या शहरात याची विक्री व्यवस्था असून उत्पादन खर्च वजा जाता 18 ते 25 टक्के नफा मिळू शकतो.

मशरूम शेती कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देण्याचा नवा स्त्रोत असल्याने शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे व श्री. पाटील यांच्याप्रमाणे आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग स्वीकारावा.

 

–  जिल्हा ‍ माहिती कार्यालय,  सांगली


Back to top button
Don`t copy text!