दैनिक स्थैर्य । दि.०२ एप्रिल २०२२ । कोरेगाव । कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे गेल्यावर्षी वाळू काढण्याच्या वादात झालेल्या खुनी हल्ल्याच्या रागातून प्रशांत भोसले याच्यासह सहा जणांनी वैभव विकास ढाणे वय २८ या युवकाचा गावातील श्री भैरोबा मंदिरासमोर तलवार, कोयत्याने वार करुन खून केला. ही घटना गुरुवारी रात्री ११.४५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगावमध्ये तणावाचे वातावरण असून, अत्यंत शोकाकूल वातावरणात वैभव ढाणे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
जळगावमध्ये वैभव ढाणे व प्रशांत भोसले यांच्यामध्ये गावातील वाळूवरुन वाद होते. गेल्यावर्षी वैभव ढाणे, विजय शिवाजी जाधव व निलेश विठ्ठल पवार यांनी प्रशांत भोसले याच्यावर त्याच कारणातून चाकूने वार केले होते. त्यामध्ये प्रशांत भोसले हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन वैभव ढाणे याच्यासह तिघांविरुध्द खुनाचा प्रयत्नाबद्दल कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुरुवारी रात्री वैभव हा भाऊ शुभमसह शेतात पाणी देण्यासाठी जाणार होता, जेवण केल्यानंतर वैभव हा पायीच भैरोबा मंदिराकडे चालत गेला. शुभम हा तंबाखूची पुडी आणण्यासाठी बाहेर गेला होता, तेथे मित्रांबरोबर बोलत बसला. घरी आल्यानंतर त्याने वैभव याला हाक मारली, मात्र तो भैरोबा मंदिराकडे चालत गेल्याचे सांगितल्याने, शुभम हा मोटारसायकलवरुन मंदिराकडे गेला, त्यावेळी मोटारसायकलच्या हेडलाईटच्या उजेडात प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, किरण संजय भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे व रोहन सुभाष भोसले हे तलवार, कोयता या शस्त्राने वैभव याच्यावर वार करत असल्याचे दिसले. शुभम याला पाहताच मारेकर्यांनी पोबारा केला. वैभव हा बेशुध्द अवस्थेत खाली पडला, त्याच्या शरिरातून मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव होत होता.
नातेवाईक मदन जाधव यांच्यासमवेत शुभम याने स्वीफ्ट कारमधून वैभव याला सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले, मात्र त्याचा मृत्यु झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. तेथे पोस्टमार्टेम करण्यात आले. शुभम ढाणे याने दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी पहाटे कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, किरण संजय भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे व रोहन सुभाष भोसले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन सावंत तपास करत आहेत.
वैभव ढाणेने भूषविले मनसेचे तालुकाध्यक्षपद
वैभव ढाणे हा शेतकरी कुटुंबातून आलेला कार्यकर्ता होता. राजकारण व समाजकारणामध्ये तो सक्रीय होता. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती, त्यावेळेस वैभव ढाणे याने तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याच्या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.