
दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । सातारा । तालुक्यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून करवडी ता. कराड गावच्या हद्दीत चौघांनी एकाच्या डोळ्यात चटणी टाकत त्यास लाकडी दांडक्याने, तलवारीने वार करून त्याचा निघृण खून केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून याबाबतची फिर्याद नवनाथ रामचंद्र पवार वय 36, रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे. याप्रकरणी चौघांवर कराड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
रमेश रामचंद्र पवार वय 40 रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा असे खून झालेल्याचे नाव आहे. तर दिपक शरद इंगळे, संदिप सुभाष इंगळे आणि अनोळखी दोघेजण नावे समजू शकली नाहीत असे गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार फिर्यादी नवनाथ व त्याचा भाऊ मयत रमेश हे दोघेजण भाजीपाला विक्रीचा फिरून व्यवसाय करीत होते. दिपक इंगळे हा त्यांच्याच गावात राहत असून गेल्या 10 ते 15 दिवसापासून त्याची पत्नी व रमेश पवार यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या कारणावरून दिपक व रमेश यांच्यात दोन दिवसापूर्वी किरकोळ वाद झाला होता.
शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रमेश हा गावातील लखन बालेखान मुलाणी याचे बोलेरो गाडीतून भाजीपाला आणण्यासाठी कराड मार्केट येथे गेला. त्यावेळी त्याचेसोबत गावातील गाडीचालक लखन मुलाणी, अमर नेटके, दत्तात्रय पवार असे होते. रात्री 10 च्या सुमारास भाजीपाला खरेदी करून आर्वी येथे येण्यासाठी निघालो असता कराड-पुसेसावळी रोडने जात असताना वाघेरी फाट्यानजीक पाठीमागून आलेल्या तवेरा गाडीने ओव्हरटेक करून बोलेरो गाडीच्या पुढे गाडी आडवी मारून दिपक इंगळे, संदिप इंगळे व अनोळखी दोघांनी रमेश यास गाडीतून बाहेर ओढून पिशवीतून आणलेली मिरची पुड रमेशच्या डोळ्यात टाकून दिपकने तवेरा गाडीतून आणलेल्या तलवार सारख्या हत्यार्याने रमेशवर वार केले. त्याचबरोबर संदिप व अन्य दोघांनी रमेश यास लाकडी दांडक्याने मारहाण केली यात रमेशचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयितांनी पोबारा केला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी रमेशचा भाऊ नवनाथ पवार याने कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.