स्थैर्य, दुधेबावी (निलेश सोनवलकर) : दुधेबावी ता. फलटण येथे जमिनीच्या वादातून सख्या भावाला भाउ, भावजय आणि 2 पुतण्यांनी कुऱ्हाड आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या गंभीर इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत त्या चौघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक नितीन सावंत म्हणाले कि, दुधेबावी ता. फलटण येथील ज्ञानदेव महादेव सोनवलकर, वय 45 आणि त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे भाऊ हणमंत महादेव सोनवलकर, वय 48 यांच्यात जमिनीचा वाद पूर्वीपासूनच होता. जमिनीच्या वादावरून गेल्या काही दिवसात किरकोळ वादावादी झालेली होती. काल (दिनांक ४ जुलै) रोजी सकाळी सातच्या सुमारास ज्ञानदेव महादेव सोनवलकर हे घराबाहेर बसले असताना त्यांचे भाऊ हणमंत सोनवलकर, त्यांची पत्नी सुनिता हनुमंत सोनवलकर, मुलगा शंभूराज हणमंत सोनवलकर, अनिकेत हनुमंत सोनवलकर हे रागारागात आले. त्यांच्यात वादावादी सुरू झाली त्या वेळी हणमंत सोनवलकर व सुनिता यांनी शिवीगाळ करून ज्ञानदेव यांना लोखंडी गजाने मारहाण केली. अनिकेत याने हातातील कुऱ्हाड ज्ञानदेव यांच्या उजव्या खांद्यावर मारली तर शंभूराजनी हातातले लोखंडी गज त्यांच्या डोक्यात मारल्याने गंभीर जखमी अवस्थेत ज्ञानदेव यांना त्यांच्या पत्नी व मुलांनी तसेच ओळखीच्या लोकांनी त्यांना फलटण येथील खाजगी रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत दाखल केले. उपचार सुरू असताना ज्ञानदेव यांचे आज दुपारी निधन झाले. या घटनेची फिर्याद ज्ञानदेव यांच्या पत्नी अनिता ज्ञानदेव सोनवलकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली आहे.
या फिर्यादीवरून हणमंत सोनवलकर, सुनिता सोनवलकर, अनिकेत सोनवलकर, शंभूराज सोनवलकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत हे करीत आहेत.