स्थैर्य, सातारा, दि.१३: पत्नीशी फोनवर सातत्याने बोलतो, सारखा घरी येतो या कारणातून चिडून जावून सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथे एका परप्रांतियाचा खून झाला. मनोहर कांबळे असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात शरद सरवदे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना दि. 10 जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, याबाबतची तक्रार प्रतीक विठ्ठल गवळी (वय 26, रा. आदर्शनगर, वासुंबे रोड, विटा, ता. खानापूर, जि. सांगली. सध्या रा. चिंचणेर निंब, जुन्या गेटजवळ, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मनोहर कांबळे हे चिंचणेर निंब गावच्या हद्दीत असणार्या रेल्वेच्या जुन्या गेटजवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली फोनवर बोलत बसला होता. याचवेळी येथे शरद सुग्रीव सरवदे (रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) आला. त्याच्या हातात कोयत्यासारखे धारधार शस्त्र होते. त्याने आल्या आल्या मनोहर यांच्या डाव्या हाताच्या कोपर्यावर, गळ्यावर डाव्या बाजूला, डाव्या हाताच्या दंडावर वार केले. यातच मनोहर यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली. दरम्यान, मनोहर कांबळे हे शरद सरवदे याच्या पत्नीशी फोनवर वांरवार बोलत असायचा तसेच तो घरीही जात होता, या कारणातून चिडून जावून हा खून झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.