दैनिक स्थैर्य । दि.०५ मे २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील फरासवाडी (कोंडवे) परिसरात मंगळवारी रात्री निर्घृणपणे झालेल्या खुनाची उकल अवघ्या बारा तासात झाली आहे. फिरोज चाॅंद मुलाणी (वय ३७, रा. फरासवाडी, मूळ राहणार कडेगाव, जि. सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून शकील निजाम फरास (वय ४२, रा. नेले, ता. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. अनैतिक संबंधास आडकाठी करत असल्याच्या कारणातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी (दि. ३) रात्रौ ८.२० वाजण्यापूर्वी कोंडवे (ता. जि. सातारा) गावच्या हद्दीत फिरोज चाँद मुलाणी यांचा अज्ञाताकडून डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून झाल्याचे उघडकीस आल्याने परिसर हादरला. या खुनाबाबत मयताचे भाऊ अस्लम चाँद मुलाणी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले.
स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने व सातारा तालुका पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. घटनास्थळावरील व आजूबाजूच्या परिसरामध्ये तपास पथकाने सखोल विचारपूस केली असता एका इसमाने फिरोजचा खून केला असल्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली. तपास पथकाने त्या माहितीमधील इसमाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. शकील निजाम फरास (वय ४२) असे त्यांचे नाव आहे. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल व कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने माझे व मयताच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते, त्यामध्ये तो आडकाठी करीत असल्याने मी त्याचा खून केला असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.