
दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या वाढे फाटा परिसरात सदरबझार येथील एका युवकाचा खून करण्यात आल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना दि. २९ जुलै रोजी ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या खून प्रकरणी वाढे, ता. सातारा येथील एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. दि. २९ जुलै रोजी ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास वाढे फाटा येथील शिवतेज हॉटेल समोर रस्त्याच्या बाजूला सचिन उमेश कांबळे, वय ३६, रा. जयमल्हार सोसायटी, सदरबझार, सातारा याला त्याचा मित्र महेश रमेश सपकाळ, रा. वाढे, ता. सातारा याने दारू पिऊन मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत केल्याने त्यामध्ये सचिन कांबळे याचा मृत्यू झाल्याची तक्रार मृत सचिन कांबळे यांच्या मामी मीना नारायण कांबळे, वय ३५, रा. जयमल्हार हाऊसिंग सोसायटी, सदरबझार, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेतील संशयित महेश रमेश सपकाळ याला दि. ४ ऑगस्ट रोजी ९.४५ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट देऊन पाहणी केली.