
स्थैर्य, सातारा, दि. २२ : वडूथ, ता. सातारा येथे मंगळवार दि. 21 रोजी राहत्या घरात दोघांनी पाय तोडून एका युवकाचा खून केल्यामुळे सातारा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, वडूथ, ता. सातारा येथे मंगळवार दि. 21 रोजी रात्री 9 च्या सुमारास दोघाजणांनी पूर्ववैमनस्यातून एका युवकावर सशस्त्र हल्ला चढवत त्याचे पाय तोडले. अतीरक्तस्त्रावामुळे त्या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. सचिन पवार असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, खून झालेला सचिन विठ्ठल पवार हा मुळचा शिवथर येथील असून सध्या तो सातारा तालुक्यातील वडूथ येथे राहत होता. वडूथ येथे तो अनेकांना सतत त्रास देत होता. गावात त्याची दहशत असल्यामुळे त्याच्या विरोधात कोणी बोलण्याचे धाडस करत नव्हते.
काही प्रकरणामध्ये त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्याने कारवाई देखील केली होती. तरीही गावातील लोकांना त्रास देणे कमी झाले नव्हते. त्याच्या त्रासाला अनेकजण कंटाळले होते. दरम्यान, सचिन पवार याने रणजित नंदकुमार साबळे आणि अमित दत्तात्रय साबळे यांना तसेच त्यांच्या कुटुंबातील काहींना त्रास दिला होता. दोन दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे रणजित आणि अमित संतापले होते.
दरम्यान, मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लॉकडाऊमुळे माणसे घरातच थांबून होती. याचवेळी संशयित रणजित आणि अमित या दोघांनीही सचिनवर धारधार शस्त्रांनी हल्ला करत कुऱ्हाडीने त्याचा पायच तोडला. यावेळी फरशीचाही वापर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सचिन त्याच्या वडूथ येथील घरी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यास मिळताच पोलीस निरीक्षक सजन हंकारे आपल्या सहकाऱ्यासमवेत तत्काळ वडूथ येथे दाखल झाले होते.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता सचिन हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर बाजूलाच त्याचा तुटलेला पाय पडला असल्याचे निदर्शनास आले. पोलीस घटनास्थळी पंचनामा करत असताना त्यांना संशयित म्हणून रणजित नंदकुमार साबळे आणि अमित दत्तात्रय साबळेची यांची नावे समजली. पोलिसांनी यापैकी एकाला वडूथ येथे तर दुसऱ्या संशयिताला सातारा येथे अटक केली. याप्रकरणी हवालदार धीरज कुंभार यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.