स्थैर्य, सांगली, दि. 19 : कुपवाड-मिरज रस्त्यालगत असलेल्या शिवशक्तीनगरमधील सचिन अण्णासाहेब सुतार (वय ३०) या तरुणाचा तीन संशयितांनी धारदार शस्त्राने खून केला. पाठीवर, पोटावर सपासप ५८ वार करून त्यांनी मोटारसायकलवरून धूम ठोकली. कुपवाड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून फरारीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास सचिन सुतार हा आपल्या मोटारसायकलवरून (एम. एच.०९ ई.डी. ७४२४) तिघे जण शिवशक्तीनगरमधून मिरजेकडे जात होता. तो घरापासून काही अंतरावर गेल्यावर समोरून मोटार सायकलवरुन आलेल्या तिघांनी त्याच्या मोटार सायकलला धडक दिल्याने सचिन सुतार रस्त्यावर पडला. तिघांपैकी एकाने सुतारला घट्ट धरून ठेवले तर अन्य दोघांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला.
सुतार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यांनी हत्यारासह मोटारसायकलीवरून धूम ठोकली. सुतारच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी सुतारला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ संदीपसिंह गिल, सहाय्यक निरीक्षक निरज उबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथकाला पाचारण केले होते. पोलिसांनी तातडीने एका संशयितास ताब्यात घेतले असून दोघांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.