स्थैर्य, सांगली, दि. १२ : बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या भावानं २२ वर्षीय तरुणाचा भोसकून खून केला. त्यामुळं सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे. बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. ओंकार माने (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर निखील सुधाकर सुतार हा स्वतःहून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाला हजर. शनिवारी रात्री उशिरा कवठेपिरान गावात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.
कुटुंबीयांचा विरोध झुगारून बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या पतीचा भोसकून खून करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान (ता. मिरज) येथे शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. या घटनेत ओंकार माने (वय २२, रा. कवठेपिरान) या तरुणाचा मृत्यू झाला, तर खून करणारा हल्लेखोर निखील सुधाकर सुतार (वय २२, रा. कवठेपिरान) हा स्वतःहून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. ऑनर किलिंगच्या घटनेने सांगली जिल्हा हादरला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार माने याने सहा महिन्यांपूर्वी गावातील तरुणीशी प्रेम विवाह केला होता. कुटुंबीयांचा विरोध असल्याने निखिल सुतार याच्या बहिणीने घरातून पळून जाऊन ओंकारसोबत लग्न केले होते. लग्नानंतर हे नवदाम्पत्य जिल्ह्याबाहेर राहत होते. काही दिवसांपूर्वीच ओंकार पत्नीसह गावात आला होता. त्याने गावात राहू नये असा सुतार कुटुंबीयांचा आग्रह होता. यावरून निखील सुतार आणि ओंकार माने या दोघांमध्ये वादही झाला होता. मात्र, सुतार कुटुंबीयांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ओंकार माने हा पत्नीसह गावात राहण्यासाठी आला होता.
ओंकार हा शनिवारी रात्री उशिरा गावातील चव्हाण वाड्याजवळ थांबला होता. यावेळी अंधारातून आलेल्या निखील सुतारने ओंकारवर हल्ला केला. गुप्तीने पोटात वार केल्याने ओंकार जमिनीवर कोसळला. वर्मी घाव बसल्याने अतिरक्तस्रावामुळे ओंकारचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर हल्लेखोर निखील हा गुप्तीसह सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली. खुनाची घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ऑनर किलिंगच्या घटनेतून कवठेपिरानमध्ये तणाव वाढल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, महिनाभरात कवठेपिरानमध्ये खुनाची दुसरी घटना घडली.