दैनिक स्थैर्य | दि. १८ जून २०२३ | सातारा |
सर्जापूर (ता. जावली) येथे दि. १४ जून रोजी शिवारात एकाचा मृतदेह आढळून आला होता. या मयताचा दारू पिताना झालेल्या वादातून खून झाल्याचे तपासात उघड झाले असून या खून प्रकरणी मेढा पोलिसांनी एकास अटक केली आहे. वैभव रवींद्र बोराटे (वय २८, रा. सर्जापूर) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जावली तालुक्यातील सर्जापूर येथे ‘मसनमोडा’ नावच्या शिवारात दि. १४ जून रोजी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता. याची खबर गावकामगार पोलीस पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिल्यावरून प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान या मयताची ओळख पटून किशोर शाम निकम (वय २९, रा. रुईघर, ता. जावली) असे मृताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी किशोर निकम यांचा मारहाण करून खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्याबाबत मेढा पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार मयत व संशयित आरोपी वैभव रविंद्र बोराटे (वय २८, रा. सर्जापूर, ता. जावली) हे दोघे दारू पित असताना त्यांच्यात वाद निर्माण होऊन त्यामध्ये आरोपीने मयतास मारहाण केल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार मेढा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी वैभव बोराटे याला चार तासात अटक केली.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचंद, मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष तासगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गंगावणे, डी.जी. शिंदे, नंदु कचरे, सनी काळे, दिगंबर माने, अभिजीत वाघमळे, चालक विजय माळी, बाळकृष्ण नष्टे यांनी सहभाग घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील अधिक तपास करत आहेत.