स्थैर्य, सातारा, दि. 01 : सातारा शहरापासून देगा -निगडी रस्त्यावर अनोळखी पुरुषाच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप मृताची ओळख पटली नसून पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, देगाव-निगडी रस्त्यावर एका रानात डोक्यात दगड घालून खून झाल्याची चर्चा सोमवारी सकाळी पसरली. यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी होऊ लागली. याची माहिती शहर व तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हद्द तालुका पोलिसांची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. घटनास्थळी डोक्यात दगड घातल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. मृताची ओळख पटत नव्हती. अंगात निळी अंडरपँट व निळया पांढऱ्या रंगाचा लायनिंगचा शर्ट आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.