स्थैर्य, पाटण, दि. 25 : दिवशी बुद्रुक, ता. पाटण येथे पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून तिच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घालून तिला ठार केल्याची घटना मंगळवार, दि. 25 रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याची फिर्याद मयतचा मुलगा निवास उत्तम महापुरे (वय 32) याने दिली असून या प्रकरणी पाटण पोलिसात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी पती उत्तम सखाराम महापुरे याला तत्काळ ताब्यात घेतले असल्याची माहिती पाटणचे प्रभारी स.पो.नि. एम. एस. भावीकट्टी यांनी दिली.
दरम्यान, खून केल्यानंतर संशयित आरोपी उत्तम सखाराम महापुरे आपली पत्नी साविला वर पाठविले आहे असे म्हणत बिनधास्त गावातून फिरत होता. यावरून त्याचा क्रूरपणा लक्षात येतो.
याबाबत पाटण पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उत्तम सखाराम महापुरे यांची पत्नी, मुले, सुना पुणे येथे राहतात. गावाकडे दिवशी बुद्रुक, ता. पाटण येथे उत्तम महापुरे एकटा राहत होता. महापुरे कुटुंबांचे गावात दिवशी बुद्रुक येथे व गावातीलच लक्ष्मीनगर वस्ती अशी दोन घरे आहेत. कोरोनामुळे जनजीवन ठप्प झाल्याने दोन-तीन महिन्यापूर्वीपासून सर्वजण गावाकडे दिवशी बुद्रुक येथे आले रहावयास आले आहेत. हे सर्व जण लक्ष्मीनगर येथील घरात वास्तव्यास होते. मंगळवार, दि. 25 रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उत्तम महापुरे याने झोपेत असलेली आपली पत्नी सौ. सावित्रीबाई उत्तम महापुरे (वय 50) हिच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घातले. अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वजण खडबडून जागे झाले. मात्र घाव वर्मी बसल्याने सावित्रीबाई महापुरे गंभीर जखमी होवून निपचित पडल्या. हल्ल्याच्या घटनेनंतर झालेल्या आरडाओरड्याने शेजारचे लोक धावून आले. युवकांनी तातडीने जखमी सावित्रीबाई महापुरे यांना कराड येथे उपचारासाठी नेण्याची धावपळ केली. कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे बेड उपलब्ध नसल्याने त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान यातील संशयित आरोपी उत्तम सखाराम महापुरे घटनेनंतर गावातून फिरत होता. हल्ला करूनही त्याला कोणतेच दुःख नव्हते. उलट आपली पत्नी साविला खून करून वर पाठविले आहे असे सांगत सुटला होता. उत्तम महापुरे याच्या विकृत स्वभावाची माहिती सर्वांना असल्याने कोणाला खरे वाटले नाही. नेहमीप्रमाणे बरळत असेल असे वाटले. मात्र घडलेल्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे अनेकांनी धाव घेतली. लक्ष्मीनगर येथे वस्ती असून त्यांच्या समाजाची अनेक घरे गावात असल्याने सगळीकडे भीती पसरली आहे. सर्वांच्या बोलण्यातून सावित्रीबाई महापुरेे यांच्याबद्दल हळहळ तर उत्तम महापुरे याच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
दरम्यान, याची फिर्याद मयत सावित्रीबाई महापुरे यांचा मुलगा निवास उत्तम महापुरे याने पाटण पोलिसात दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी उत्तम महापुरे याला पाटण पोलिसांती ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास स.पो.नि. एम. एस. भावीकट्टी करत आहेत.