दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२२ । सातारा । सातारा बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील नटराज मंदिराच्या दारात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी वाई येथील अर्जुन मोहन यादव उर्फ राणा औंधकर (वय २५, सिद्धनाथवाडी वाई ) या गुंडावर गोळीबार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी दुपारी घडल्याने सातारा शहर परिसरात एकच खळबळ उडाली. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मयत गुंड नटराज मंदिरात देवदर्शनासाठी आला होता. परत जात असतानाच मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना अद्याप कोणताही धागादोरा मिळालेला नाही.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सर्व पोलिसांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंदिर परिसरात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज या सातारा पोलिसांकडून तपासले जात आहे.
गुंड अर्जुन मोहन यादव उर्फ राणा औंधकर (वय २५, सिद्धनाथवाडी वाई ) याच्यावर १४ मे २०२० रोजी रविवार पेठ वाई येथे त्याच्या मित्राकडे बसलेला असताना कुविख्यात गुंड बंटी जाधव हा त्याच्यात साथीदारांसह तेथे दमदाटी व धाक दाखविण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली.यावेळी बंटी जाधव याच्या हातातील पिस्तूल खाली पडले होते. ते पिस्तूल उचलून धाक दाखवत असताना अर्जुन यादव याच्याकडून गोळीबार झाला होता. या गोळीबारात बंटी जाधव बरोबर आलेला युवक भैया मोरे हा जखमी झाला होता. वाई पोलीस ठाण्यात यादव याच्यावर शस्त्रबंदी कायदा व हाफ मर्डर चा गुन्हा दाखल झाला होता. तो सध्या तात्पुरत्या जामीनावर बाहेर होता. तो सध्या सातारा, फलटण, बारामती या परिसरात राहत होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये वाई पोलिसांनी चौकशीकामी त्याला वाई येथे बोलावले होते. त्यावेळी त्याने रस्त्यात उभे राहून जोरजोरात आरडाओरड करत गोधळ करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती व न्यायालयाला त्याचा जामीन रद्द करण्याची विनंती केली होती. त्याच्यावर इतर गुन्हा कोणताही दाखल नाही. त्याच्या आई आणि भाऊ असा परिवार आहे मात्र तो चुलत्यांकडे राहीला होता. आईचा वडापाव चा गाडा असून भाऊ पेट्रोल पंपावर काम करतो.