स्थैर्य, मुंबई दि. 6 : दैनिक ‘पुण्य नगरी’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक, संपादक मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरलीधर शिंगोटे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, जुन्नर तालुक्यातील उंब्रज सारख्या छोट्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधर शिंगोटे यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमुहाचे प्रमुख हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्य, कष्टकरी वाचकांशी बांधिलकी जपली. पुण्य नगरी, मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, कर्नाटक मल्ल्या, तमिळ टाईम्स, यशोभूमी, हिंदमाता या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड या चार भाषिक वाचकांना जोडले. मुरलीधर शिंगोटे यांनी कोणत्याही एका राजकीय विचारधारेकडे न झुकता कायम तटस्थ भूमीका ठेवली. त्यांचे यश आणि वेगळेपण मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी आश्चर्यच मानावे लागेल.